धर्मावर आधारित राजकारणाला नेहमी विरोध करणारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये थेट प्रभू श्रीरामांच्या चरणी लीन झाला आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुरूवात केल्यानंतर आता या महिन्यात केरळमध्ये रामायण महिना साजरा केला जाणार आहे. माकपने केरळमधील सर्व १४ जिल्ह्यांत १५ जुलै ते १५ ऑगस्ट दरम्यान ‘रामायण महिन्याचे’ आयोजन केले आहे.

या दरम्यान हिंदू घरांमध्ये प्रभू श्रीरामांच्या कथा ऐकवल्या जातात. धार्मिक प्रथेप्रमाणे यामुळे गरिबी आणि पावसामुळे होणारे आजार दूर होतात. त्यामुळे माकपने या संपूर्ण महिन्यात रामायण व्याख्यानाचे आयोजन करण्याचे नियोजन केले आहे.

या कालावधीत राज्यातील १४ जिल्ह्यातील संस्कृत संगम संस्थेचे सदस्य रामायणावर व्याख्यान देतील. या कार्यक्रमाच्या माध्यमातून माकप आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे माकपवर नास्तिक असल्याचा आरोप केला जातो. केरळमध्ये १७ जुलैपासून पारंपारिक मल्याळम महिना कारकिडकम साजरा केला जातो. हा महिना १७ जुलैपासून सुरू होतो.

संस्कृतच्या प्रेमाखातर माकपने २०१७ साली संस्कृत संगम या संस्थेची स्थापना केली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संस्कृत आणि पुराणाबाबत चुकीची माहिती देण्यात आली आहे. या चुकीच्या गोष्टी बदलण्यासाठी आम्ही मोठे प्रयत्न करत आहोत. धर्माबद्दलची आपली मते बदलली नसून रामाची खरी कथा लोकांना या उपक्रमाच्या माध्यमातून सांगणार असल्याची भूमिका माकपने घेतली आहे.