संयुक्त राष्ट्रांच्या तज्ज्ञांचा अहवाल

जिनिव्हा : पत्रकार जमाल खशोगी यांच्या खुनाचा संबंध सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याशी जोडणारा ‘विश्वासार्ह पुरावा’ असल्याचे सांगून, सलमान यांच्या परदेशातील वैयक्तिक मालमत्तांवर निर्बंध आणावेत, अशी मागणी संयुक्त राष्ट्रांतील एका तज्ज्ञाने बुधवारी केली.

गेल्या ऑक्टोबर महिन्यात झालेल्या खशोगी यांच्या हत्येत राजपुत्र मोहम्मद यांचा थेट संबंध असल्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांचे अतिन्यायिक मृत्युदंडाबाबतच्या विशेष दूत अ‍ॅग्नेस कॅलामार्ड यांच्या नव्या अहवालात नमूद करण्यात आली आहे.

कॅलामार्ड या मानवाधिकारविषयक स्वतंत्र तज्ज्ञ असून, त्या संयुक्त राष्ट्रांच्या वतीने बोलत नाहीत. या प्रकरणाचा औपचारिक फौजदारी तपास सुरू करण्यासाठी त्यांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गुटेरेस यांची भेट घेतली.

वॉशिंग्टन पोस्टचे स्तंभलेखक आणि राजपुत्र मोहम्मद यांचे टीकाकार असलेले खशोगी यांचा गेल्यावर्षी २ ऑक्टोबरला इस्तंबूलमधील सौदी अरेबियाच्या दूतावासात खून करण्यात आला होता. या कृत्याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचा आव सौदी अरेबियाने सुरुवातीला आणला होता. सौदीच्या वकिलांनी राजपुत्रांचा या प्रकरणाशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे. तथापि, या खुनामागे राजपुत्राचा हात असल्याचा विश्वासार्ह पुरावा असल्याचे आपल्या चौकशीत आढळले असून; राजपुत्रासह सौदीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची चौकशी होणे आवश्यक आहे, असे कॅलामार्ड यांनी म्हटले आहे.