बनावट सीबीआय अधिकारी बनून खंडणीसाठी अपहरण केल्याप्रकरणी कोलकाता पोलीस रिपब्लिक बांगलाच्या एका पत्रकाराचा शोध घेत आहेत. अविशेक सेनगुप्ता असे या आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. आता पर्यंत या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. दरम्यान, हे प्रकरण समोर आल्यानंतर रिपब्लिक बांगलाने बुधवारी एक निवेदन देत सेनगुप्ताला काढून टाकल्याचे सांगितले.

२४ मे रोजी कोलकाता येथील बोसपुकुर येथे राहणाऱ्या स्वाती नाथ रॉय यांनी पती अजित रॉय याला सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगणाऱ्यां लोकांनी पकडले आहे अशी पोलिसांत तक्रार केली होती. अजित रॉय हा वेब डिझायनर आहे. त्यानंतर तिला २ कोटी रुपयांची मागणी करणारा फोन त्या व्यक्तीकडून आला होता. नंतर ही रक्कम १५ लाखांवर आली. संध्याकाळी ८ वाजता पुन्हा खंडणीचा फोन आल्यानंतर अजितच्या पत्नीने एका ठिकाणी शौचालयात ही रक्कम त्यांच्याकडे दिली होती. पैसे दिल्यानंतर तिने पतीला सोडवले आणि पोलिसांकडे संपर्क साधला.

त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी स्वरूप रॉय, प्रतीक सरकार आणि राजेश अधिकारी यांना अटक केली. अपहरण आणि जबरदस्तीने ताब्यात घेणे, खंडणी, गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशी दरम्यान रिपब्लिक बांगलाच्या सेनगुप्ता पुढे आले.

“सेनगुप्ता हे प्रोबेशनवर होते ते पूर्णवेळ कर्मचारी नव्हते. त्यांच्यावरील गंभीर आरोपांची माहिती मिळाल्यानंतर लगेचच त्यांना २५ मे रोजी निलंबित करण्यात आले होते. त्यांच्या निलंबनासंदर्भात अविशेक सेनगुप्ता यांना ईमेलद्वारे माहिती देण्यात आली आहे. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही तो झाला नाही आणि त्यांचा पत्ता देखील माहित नाही,”असे रिपब्लिक बांगलाने दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

३० जानेवारी रोजी सेनगुप्ताने रिपब्लिक बांगलामध्ये काम सुरु केले होते. सोशल मीडिया अकाऊंटवर त्याने मुख्य बातमीदार असल्याचे सांगितले होते. तसेच अन्य चार बंगाली स्थानिक वृत्तवाहिन्यांसाठी काम केल्याचा दावा केला होता. रिपब्लिक बंगालासह बर्‍याच वृत्तवाहिन्यांमध्ये त्यांनी सीबीआय आणि पोलिसांच्या मारहाणीबद्दलच्या बातम्या केल्या होत्या असे सांगण्यात येत आहे.

नक्की वाचा >> बंगाल हिंसाचाराप्रकरणी सुप्रीम कोर्टाचे खडे बोल; नागरिकांच्या पलायनाबाबत मागितलं स्पष्टीकरण

गुन्हा दाखल केलेल्यांमध्ये स्वरूप रॉयसह सात पुरुष, एक महिला आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीचे नाव आहे. यांनी सीबीआयचे अधिकारी असल्याचे सांगत अजित रॉय यांच्या ऑफिसवर छापा टाकला होता. त्यांनी तीन लॅपटॉप व एक हार्ड डिस्क ताब्यात घेतली आणि अजितला निजाम पॅलेसमध्ये (जेथे सीबीआयचे कार्यालय आहे) नेले होते.