भारतीय लष्कर आणि सुरक्षा दलांचे जवान अहोरात्र देशाच्या सीमांचे रक्षण करतात. देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी जवान सदैव तत्पर असतात. देशवासीयांना निश्चिंतपणे जगात यावे, यासाठी जवान प्रसंगी बलिदान देण्यासही मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळेच जवानांबद्दल देशवासीयांच्या मनात आदराची भावना आहे. जम्मू काश्मीरमधील विमानतळावर याचीच प्रचिती आली. केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे जवान विमानतळावर येताच विमानतळावर उपस्थित असलेल्या सर्वांनी टाळ्यांचा कडकडाट केला.

शनिवारी जम्मूच्या विमानतळावर ‘सीआरपीएफ’च्या जवानांची एक तुकडी दाखल झाली. हे जवान कर्तव्य बजावण्यासाठी श्रीनगरला जात होते. ‘सीआरपीएफ’च्या जवानांची तुकडी विमानतळावर दाखल होताच त्यांच्या सन्मानार्थ अनेकजण उभे राहिले. सर्वांनी जवानांसाठी टाळ्यांचा कडकडाट केला. देशवासीयांनी दिलेला आदर पाहून जवानांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य उमटले. अनेक जवानांनी हा अभिमानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद केला. सर्वच उपस्थितांनी अभिवादन केल्याने जवानांचा उर भरुन आला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वीच काश्मीरमध्ये ‘सीआरपीएफ’चे जवान प्रवास करत असताना त्यांच्यावर दगडफेक झाली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही आला होता. त्यावेळी दगडफेक सुरु असतानाही जवानांनी संयम राखत मार्गक्रमण केले होते. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या विमानतळावरही असाच एक प्रसंग पाहायला मिळाल होता. त्यावेळी विमानतळावर उपस्थित असलेल्यांनी अमेरिकी सैन्याला अभिवादन केले होते.