काश्मीर खोऱ्यात दगडफेक करणाऱ्या तरुणींवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसंच कारवाई करण्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाने (सीआरपीएफ) महिला कमांडोना तैनात करण्याचा निर्णय़ घेतला आहे. काश्मीर खोऱ्यात जवानांवर दगडफेक करणाऱ्यांमध्ये अनेकदा तरुण मुलींचा समावेश असतो. या तरुणींवर कारवाई करण्यासाठी ५०० महिला कमांडोना तैनात करण्यात आलं आहे.

सीआरपीएफच्या महिला युनिटला सर्व प्रकारची शस्त्रं चालवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं असून यामध्ये पम्प अॅक्शन गन्स, पावा शेल्स फायरिंगासठी वापरण्यात येणाऱ्या शॉट गन्स, पेलेट गन्ससहित इतर शस्त्रांचा समावेश आहे. महिला कमांडोना तरबेज करण्यात आलं असून, काश्मीर खोऱ्यातील हिंसाचारासंबंधी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याशिवाय त्यांना रात्रीच्या वेळी कारवाई करण्यासाठी डोळे झाकून दोन हात करण्याचं प्रशिक्षणही दिलं जात आहे.

महिला कमांडोना शस्त्र बाळगण्याची परवानगी असणार आहे. कारण जर दहशतवादी हल्ला झाला झाला तर महिला कमांडो त्यांना उत्तर देऊ शकतील. संरक्षणासाठी त्यांना कमी वजनाचे बॉडी प्रोटेक्टर्स, हेल्मेट, बुलेटप्रूफ जॅकेट आणि शस्त्र देण्यात येणार आहे.

श्रीनगरमध्ये ४५ दिवसांच्या प्रशिक्षणानंतर महिला कमांडोना शोपियन, पुलवामा, कुलगाम, बडगम आणि अनंतनाग या ठिकाणी तैनात करण्यात येणार आहे.

जर एखाद्या दहशतवादी कारवाईदरम्यान महिलांना दगडफेक करण्यास सुरुवात केली तर महिला कमांडो पुढे होत कारवाई करतील, तर पुरुष कमांडो त्यांना मदत करतील. २०१६ पासून खोऱ्यात दगडफेकीच्या घटनांचं प्रमाण कमी झालं आहे. यावर्षी दगडफेकीच्या एकूण ३०० घटना घडल्या आहेत.