क्युबामध्ये बोईंग ७३७ प्रवाशी जेट विमान कोसळल्याची घटना घडली आहे. दरम्यान, १००हून अधिक प्रवाशांचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच हे विमान कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिले आहे. या अपघातात झालेल्या वित्त आणि जीवितहानी झाल्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांना विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.


अपघातग्रस्त विमान हे डोमेस्टिक विमान होते. ते हवाना येथून होलगुइनकडे निघाले होते. या विमानातून १०४ प्रवासी प्रवास करीत होते. विमान धावपट्टीच्या जवळच कोसळल्याने त्याने पेट घेतला त्यामुळे मोठ्या प्रमाणावर काळ्या धुराचे लोट पसरल्याबाबतचे काही छायाचित्रे सोशल मीडियातून प्रसिद्ध झाल्याची माहिती एनडीटीव्हीतील वृ्त्तात देण्यात आली आहे.