हतबल सरकारकडून उपाययोजनांचा मारा सुरूच; नोटाबदलाची मर्यादा दोन हजारांवर

नोटाबंदीच्या निर्णयामुळे देशात निर्माण झालेला चलनतिढा सुटावा यासाठी केंद्र सरकारकडून रोज नवनवीन उपाययोजनांचा मारा सुरू असतानाच बँका आणि एटीएम केंद्रांसमोरील रांगांमध्ये मात्र तसूभरही फरक पडेलला नाही. त्यातच या मुद्दय़ावरून विरोधकांनी संसदेत आणि संसदेबाहेरही घेरल्याने केंद्राच्या हतबलतेत आणखीनच भर पडली आहे. या पाश्र्वभूमीवर केंद्राने गुरुवारी काही उपाययोजना जारी केल्या. त्यात शेतकरी आणि ज्यांच्या घरात लग्नकार्य आहे अशांना अनुक्रमे ५० हजार आणि अडीच लाख रुपये बँकेतून काढण्याच्या परवानगीचा समावेश आहे. एकीकडे शेतकरीवर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न केंद्राने केला असला तरी सामान्यांच्या चलनचिंतेत भर पडण्याची चिन्हे आहेत. कारण पाचशे-हजाराच्या जुन्या नोटा बदलून त्या बदल्यात साडेचार हजारापर्यंतच्या नव्या नोटा घेण्याची मर्यादा आता दोन हजार रुपये करण्यात आली आहे. आज, शुक्रवारपासून ही मर्यादा लागू असेल.

शेतकरीवर्गाला दिलासा

पुरेशा पावसामुळे सुखावलेला शेतकरीवर्ग आता पेरण्यांच्या तयारीत असतानाच नोटाबंदीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यावर उतारा म्हणून केंद्राने आता शेतकऱ्यांना दर आठवडय़ाला बँकेतून ५० हजार रुपये काढण्याची मुभा दिली आहे. त्याचप्रमाणे पीकविम्याचा हप्ता भरण्यास १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. रब्बीच्या मोसमात पेरण्यांची कामे योग्य पद्धतीने व्हावीत आणि खते, बियाणे आणि अन्य घटकांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पुरेशी रक्कम उपलब्ध व्हावी हा हेतू सफल होणार आहे, असे केंद्रीय अर्थव्यवहार सचिव शक्तिकांत दास यांनी सांगितले.

नोटाबदलाची मर्यादा दोन हजारांवर

नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाल्यावर देशभरात निर्माण झालेला चलनकल्लोळाचा गुरुवारी नववा दिवस होता. चलनचिंतेने ग्रासलेले सामान्यजन बँका आणि एटीएम केंद्रांसमोर तासन्तास ताटकळत असल्याचे दृश्य या दरम्यान नेहमीचेच झाले. या रांगा कमी करण्यासाठी केंद्राने आतापर्यंत एटीएम केंद्रांमध्ये पुरेशा नोटा साठवणे, बँकांमध्ये पुरेसा चलनसाठा करणे, जुन्या नोटांच्या बदल्यात साडेचार हजार रुपयांच्या नव्या नोटा देणे, नोटा बदलून दिलेल्या व्यक्तीच्या उजव्या बोटावर शाई लावणे आदी उपाययोजना केल्या. मात्र, रांगांवर त्याचा तसूभरही परिणाम झाला नसल्याचेच निदर्शनास आले आहे. त्यातच पाचशे-हजाराच्या जुन्या नोटांच्या बदल्यात साडेचार हजार रुपये बँकेतून घेण्यावर केंद्राने गुरुवारी पुन्हा मर्यादा आणली. आज, शुक्रवारपासून जुन्या नोटांच्या बदल्यात फक्त दोन हजार रुपयेच मिळू शकणार आहेत.

लग्नकार्य असलेल्या घरांनाही सूट

घरात लग्नकार्य असताना बँकेच्या खात्यातून पैसे काढण्यात आलेल्या मर्यादेमुळे चिंतेत असलेल्यांनाही केंद्राने दिलासा दिला आहे. त्यानुसार पॅन तपशील देऊन मुला/मुलीचे आई-वडील अथवा स्वत: वधू/वर यांना त्यांच्या बँकेतून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत.

संसदेत गदारोळ

नोटाबंदीच्या निर्णयावरून केंद्राला लक्ष्य करण्याची विरोधकांची मोहीम संसदेच्या दोन्ही सभागृहांत गुरुवारीही कायम होती. विरोधकांनी केलेल्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज दुपापर्यंत स्थगित करावे लागले. मात्र, दुपारनंतर दिवसभरासाठी ते स्थगित करण्यात आले. तर राज्यसभेत विरोधकांनी सरकारला पुन्हा धारेवर धरले. नोटाबंदीच्या निर्णयामुळे सामान्यांना दररोज किती अडचणींना सामोरे जावे लागत आहे, याची जंत्रीच विरोधकांनी वाचून दाखवली. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी तर देशभरात नोटारांगेचे ४० बळी गेल्याचे सांगत उरी हल्ल्यातील शहिदांची संख्या त्यापेक्षाही कमी होती, अशी तुलना केली. आझादांच्या या तुलनेमुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी पक्षाने आझाद यांनी सभागृहाची माफी मागावी, अशी आग्रही मागणी केली.

सहकारी बँकांना परवानगी नाहीच

चलनातून बाद झालेल्या पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास सहकारी बँकांना परवानगी न देण्याचा पुनरुच्चार अरुण जेटली यांनी केला आहे. सहकारी बँकांना चलनबदली करण्याची परवानगी दिल्यास सहकारी बँका काळा पसा पांढरा करण्याचे केंद्र बनतील, असे जेटली यांनी सांगितले. रिझव्‍‌र्ह बँकेने १४ नोव्हेंबर रोजी परिपत्रक काढून जिल्हा सहकारी बँकांना रोकड स्वीकारण्यास आणि चलनबदल करण्यास बंदी घातली होती. राज्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीयकृत किंवा खासगी बँकांचे जाळे नसल्यामुळे सहकारी बँकांवरील ही बंदी मागे घेण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेकडूनही ही मागणी उचलून धरण्यात आली आहे. शिवसेनेच्या खासदारांनी बुधवारी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांना दिलेल्या निवेदनात याबद्दल उल्लेख करण्यात आला होता.

टोलमुक्तीला पुन्हा मुदतवाढ

पाचशे-हजाराच्या जुन्या नोटांमुळे होत असलेला घोळ लक्षात घेता देशभरातील सर्व टोलनाक्यांवर सुरू असलेली टोलमुक्ती २४ नोव्हेंबपर्यंत वाढवण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ मंत्रालयातर्फे गुरुवारी ही मुदतवाढ जाहीर करण्यात आली.

निर्णय मागे घेणार नाही; अरुण जेटली ठाम

नोटाबंदीचा निर्णय हा सुनियोजित निर्णय असल्याने तो मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष या मुद्दय़ावरून लोकांची दिशाभूल करीत असून देशात अस्वस्थता कशी निर्माण होईल, याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. एटीएम केंद्रांवर पुढील आठवडय़ापासून पुरेशी रक्कम उपलब्ध होईल, असेही त्यांनी सांगितले.

ममतांचा इशारा

नोटाबंदीच्या निर्णयाच्या प्रखर विरोधाचा झेंडा हाती घेतलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता हा निर्णय तीन दिवसांत मागे घेतला न गेल्यास मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा केंद्र सरकारला दिला आहे. त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पाठिंबा दर्शवला आहे.