News Flash

Cyclone Tauktae : केरळ, तामिळनाडूला ऑरेंज अ‍ॅलर्ट, गंभीर पूरस्थितीचा धोका!

तौते चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि केरळ राज्यांना ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे.

भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर Tauktea Cyclone चा धोका वाढू लागला आहे. सध्या हे वादळ लक्षद्वीप बेटांच्या परिसरातून पश्चिम किनारपट्टीच्या दिशेने सरकू लागले असून तामिळनाडू आणि केरळ या राज्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. केंद्रीय जल आयोगाने (Central Water Commissione) यासंदर्भात दोन्ही राज्यांसाठी ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केला आहे. या दोन्ही राज्यांच्या किनारी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण होण्याचा इशारा जल आयोगाकडून देण्यात आला आहे. शनिवारी सकाळी केरळमधील मनिमला आणि अकानकोविल तर तामिळनाडूमधील कोडईयार या तिन्ही नद्या धोक्याच्या पातळीच्याही वर वाहात आहेत. त्यामुळे केरळ आणि तामिळनाडू या दोन्ही राज्यांनी किनारी भागामध्ये सतर्कतेचे आदेश दिले असून आवश्यक ती तयारी करण्यात आली आहे. त्यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील स्थानिक प्रशासनाला सतर्क आणि तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

शुक्रवारी रात्री भारतीय हवामान विभागाने लक्षद्वीपजवळ अरबी समुद्रामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याचा अंदाज वर्तवला होता. तसेच, पुढच्या १२ तासांमध्ये हे चक्रीवादळ उग्र रूप धारण करेल, असं देखील सांगण्यात आलं होतं. शनिवारी सकाळपासूनच तौते चक्रीवादळानं आपली मार्गक्रमणा त्या दिशेने सुरू केली आहे.

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे आता चक्रीवादळात रुपांतर झालं आहे. चक्रीवादळ संभाव्य मार्गाने गुजरातच्या दिशेने जात असताना १५ ते १७ मे दरम्यान ते महाराष्ट्र किनारपट्टीला समांतर जाणार आहे. प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने होता. त्यामुळे महाराष्ट्र किंवा गुजरातला त्याचा फटका बसणार नसल्याचे दिसून येत होते. मात्र, सध्याच्या अंदाजानुसार चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे जाण्याचे संकेत आहेत. परिणामी किनारपट्टीच्या भागात ताशी ७० ते ८० किलोमीटर वेगाने वादळी वारे आणि अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

Tauktee Cyclone : चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी मुंबई सज्ज – महापौर किशोरी पेडणेकर

NDRF च्या ५३ तुकड्या तैनात!

दरम्यान, या परिस्थितीचा सामना करण्यासाठी देशातील आणि प्रभावित होणाऱ्या राज्यांमधील आपातकालीन मदत यंत्रणा सज्ज झाली आहे. केरळ, तामिळनाडू, कर्नाटक लक्षद्वीप, गोवा आणि महाराष्ट्राच्या किनारी भागात या चक्रीवादळाचा कमी-अधिक प्रमाणात प्रभाव जाणवू शकतो. त्यानुसार सर्व पथकं सज्ज असल्याचं NDRF कडून सांगण्यात आलं आहे. “तौते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी आणि त्या काळात मदतकार्य करण्यासाठी एनडीआरएफची ५३ तुकड्या सज्ज आहेत. यापैकी २४ तुकड्यांना आधीच संभाव्य प्रभावित क्षेत्रांमध्ये पाठवण्यात आलं आहे. तर उरलेल्या २९ तुकड्या ऐन वेळी ५ सर्वाधिक धोका असणाऱ्या राज्यांमध्ये निर्माण होणाऱ्या परिस्थितीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत”, असं एनडीआरएफकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

तौते चक्रीवादळ गुजरातच्या दिशेनं; महाराष्ट्रावर कुठे आणि काय होणार परिणाम?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे प्रशासनाला आदेश

तौते वादळाचा महाराष्ट्राच्या किनारी भागाला फटका बसू शकतो, असा अंदाज असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील किनारी भागातील प्रशासनाला आदेश दिले आहेत. “तौते चक्रीवादळासंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी किनारी भागातील जिल्हा प्रशासनाला, विभागीय आयुक्तांना आणि जिल्हाधिकाऱ्या सतर्क राहण्याचे आणि संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. विशेषत: पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत”, असं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 15, 2021 1:41 pm

Web Title: cyclone tauktae update orange alert for kerala tamulnadu coastal area pmw 88
Next Stories
1 Corona: दिल्लीतील प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर बँक; मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घोषणा
2 बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भावाचं करोनामुळे निधन
3 ‘…उसने माँ गंगा को रुलाया है’; काँग्रेस नेते राहुल गांधी यांची पंतप्रधानांवर अप्रत्यक्षरित्या टीका
Just Now!
X