आईचे दूध हे बाळासाठी वरदान समजले जाते. मात्र बाबांनी कधी बाळाला अंगावर दूध पाजल्याचे ऐकले आहे का? तुमचे उत्तर नाही असे असेल. पण मॅक्समिलन न्यूबर हा जेव्हा बाबा झाला तेव्हा त्याने आईचे हे कर्तव्यही पार पाडले. मॅक्समिलन न्यूबर आपल्या चिमुकलीचा बाबा असूनही तिच्यासाठी आई देखील झाला. मॅक्समिलन न्यूबरची पत्नी एप्रिलचे प्रसुतीदरम्यान सिझर झाल्याने तिला आपल्या चिमुकलीला अंगावर दूध पाजणे शक्य नव्हते. त्याचमुळे तिचे कर्तव्य मॅक्समिलनला पार पाडावे लागले. परिचारिकेने सांगितलेल्या दूध पाजण्याच्या पद्धतीप्रमाणे त्याने हे दूध आपल्या चिमुकलीला पाजले. मॅक्समिलनचा आपल्या चिमुकलीला दूध पाजतानाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

मॅक्समिलनने त्याच्या फेसबुक पोस्टवर आपला अनुभव लिहिला आहे. मुलीला दूध पाजताना आपल्याला आनंद वाटला. मला रुग्णालयात सांगण्यात आलेली लहान बाळाला दूध पाजण्याची पद्धत अत्यंत सोपी आणि साधी आहे. यामुळे मी मुलीला दूध पाजणारा पहिला बाबा होऊ शकलो असे म्हणत त्याने आनंद व्यक्त केला आहे. अमेरिकेतील ग्रँड माऊंड लोवा या ठिकाणी हे मॅक्समिलन न्यूबर आणि त्याची पत्नी एप्रिल वास्तव्य करतात.

WBAY ने दिलेल्या अहवालानुसार एप्रिल न्युबरच्या प्रसूतीत काहीश्या अडचणी आणि गुंतागुंत निर्माण झाली होती. तिचे एकदाच नाही तर दोन ते तीनवेळा सिझर करावे लागले. आपल्या बाळाला जन्म दिल्यावर तिला दूध पाजायचे असे एप्रिलने ठरवले होते. मात्र तिला ते करता आले नाही त्यामुळे सलाईनसारख्या एका बाटलीतून कृत्रीम स्तन तयार करून मॅक्समिलनने बाळाला दूध पाजले आणि अशा प्रकारे तो बाळाला अंगावर पाजणारा पहिला बाबा ठरला. काही दिवसांनी जेव्हा एप्रिलला बरे वाटेल तेव्हा ती आपल्या बाळाला स्तनपान करू शकेल.

रुग्णालयातील या पद्धतीने चिमुकलीला दूध पाजण्यात आले

मॅक्समिलनने घेतलेला निर्णय हा एक आदर्श निर्णय आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत त्याच्या चेहेऱ्यावरचा आनंदच सगळे काही सांगून जातो आहे. आपल्या मुलीसाठी तो खऱ्या अर्थाने सुपर डॅड झालाय हे नक्की !