राजधानी दिल्लीत रविवारी रात्री भरधाव बसमध्ये एका २३ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्काराचे संसदेत मंगळवारी अतिशय तीव्र पडसाद उमटले. बलात्काऱ्यांविरुद्ध जलदगती न्यायालयात खटला चालवून त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सदस्यांनी केली. दिल्लीच्या कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या प्रकरणाची विशेष न्यायालयात दैनंदिन सुनावणी करण्यात येईल, अशी घोषणा केली. केंद्रीय गृहसचिवांच्या अध्यक्षतेखाली विशेष कृती दलाची स्थापना करण्यात येत असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
लोकसभेत आणि राज्यसभेत भाजपने हा मुद्दा स्थगनप्रस्तावाद्वारे उपस्थित केला आणि प्रश्नोत्तराच्या तासात त्यावरून उडालेल्या गोंधळामुळे राज्यसभेचे कामकाज तहकूब करावे लागले.
लोकसभेच्या अध्यक्ष मीराकुमार, विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज आणि काँग्रेसच्या गिरीजा व्यास यांच्यासह तमाम राजकीय पक्षांच्या सदस्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवर चिंता व्यक्त केली.
दिल्लीच्या मुख्यमंत्री एक महिला असताना हे शहर महिलांसाठी सर्वात असुरक्षित आहे, अशी टिप्पणी होते तेव्हा सर्वात दुख होते. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याऐवजी मुलींनी रात्री एकटय़ाने बाहेर पडू नये, असा सल्ला शीला दीक्षित देतात, यावर सुषमा  स्वराज यांनी आक्षेप घेतला. ही मुलगी जगूही शकत नाही व मरूही शकत नाही, असे असेल तर त्या नराधमांना फाशीच द्या, अशी मागणीही त्यांनी केली.
राज्यसभेतही शिवसेनेचे गटनेते संजय राऊत यांनी तशी मागणी केली. सपाच्या जया बच्चन यांना तर बोलताना अश्रू आवरले नाहीत.    

महिनाभरातील अन्य बलात्कार आणि विनयभंग
१७ डिसेंबर- लग्नाचे आमिष दाखवून कळव्यात तरुणीवर बलात्काऱ
१६ डिसेंबर- आजारी मुलाला दवाखान्यात नेणाऱ्या महिलेचा उल्हासनगरात विनयभंग़
१६ डिसेंबर- डोंबिवलीतील मानपाडा रोडवर २४ वर्षीय तरुणीचा विनयभंग
१३ डिसेंबर- कल्याणमधील कोळसेवाडी येथे तरुणीचे अपहरण आणि बलात्काऱ
१४ डिसेंबर- शिक्षिकेसह अन्य तीन महिलांच्या तक्रारीवरून विनयभंगप्रकरणी मुंबई विद्यापीठाचे प्रा़ बापू चौगुले आणि नीलेश लोहार यांना अटक़
१४ डिसेंबर-  उल्हासनगरमधील आनंदनगर परिसरात ७ वर्षांच्या मुलीचा शेजाऱ्याकडून विनयभंग
१४ डिसेंबर- शहापुरातील सारमाळ येथील शाळकरी मुलीला रस्त्यात अडवून हेमंत जाधव या तरुणाकडून विनयभंग़
११ डिसेंबर- डोंबिवलीतील राम नगर येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग़  तीन आरोपींना अटक़
११ डिसेंबर- डोंबिवलीतील विष्णू नगर येथे रिक्षाचालकाचा ४ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्काऱ
११ डिसेंबर- डोंबिवलीतील खंबाळपाडा येथे एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीची छेडछाड़
९ डिसेंबर – ओमप्रकाश मिश्रा या डॉक्टरकडून विवाहितेचा विनयभंग़
३ डिसेंबर- डोंबिवलीच्या नवनीत नगरात तरुणीच्या छेडछाडीतून झालेल्या वादातून संतोष विच्छिवर या तरुणाची हत्या़    
बॉलीवूडला धक्का
सलमान खान : माझ्या मनात पहिला विचार आला की अशा नराधमांना ठार केले जावे. पण आपल्याला कायद्यामुळे कितीतरी गोष्टी पाळाव्या लागतात. जे घडले ते धक्कादायक आणि लज्जास्पद आहे. त्यांना फाशी नाही देता आली तरी जन्मठेप द्यावी.
रवीना टंडन : बलात्कारी आणि खुनी जामिनावर सुटतात आणि उजळ माथ्याने वावरतात. काहीवेळा अशांना राजकीय पक्ष उमेदवारीही देतात.
करीना कपूर : आपल्या कायद्यांचा फेरविचार करण्याची वेळ आली आहे. आपल्या देशात न्याय मिळायला कितीतरी वेळ लागतो. न्याय हा वेगाने मिळेल, अशी यंत्रणा उभारा.
जुही चावला : मला कधी कधी वाटतं की खून का बदला खूनसे असाच कायदा हवा. तरच असे प्रकार घडणार नाहीत.
प्रीती झिंटा : मन सुन्न आणि विमनस्क करणारी घटना. दिल्ली महिलांसाठी किती असुरक्षित बनत आहे, त्याचा प्रत्ययच येतो. बलात्काऱ्यांना नपुंसक करावे.
फरहान अख्तर : नागरिक म्हणून भारतीयांची मान शरमेनं खाली गेली आहे. न्यायदेवता झोपली आहे का? तातडीने आणि कठोरात कठोर सजा देऊनच असे प्रकार रोखले जाऊ शकतात. इथे न्याय इतका संथगतीने मिळतो आणि सजा इतकी कमी असते की गुन्हेगारांना परिणामांची भीतीच वाटत नाही.
अर्जुन रामपाल : अशा नराधमांसाठी नवे कायदे आणि कठोरात कठोर सजा करण्याची गरज आहे. त्यांना सार्वजनिक ठिकाणी चाबकाने फोडून काढावे. आता संयमाची हद्द झाली.
अनुराग कश्यप : (महिलांना ‘चीज बडी है मस्त मस्त’ असा दर्जा देणाऱ्या आपल्याच क्षेत्रावर कोरडे ओढताना म्हणाला) या देशाचा दुसरा धर्मच असलेल्या चित्रपट आणि दूरचित्रवाहिन्यांवर स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू म्हणून दाखवणं प्रथम थांबलं पाहिजे.
हुमा कुरेशी : स्त्रीला कुठेही कसेही वागवू शकतो, असेच बलात्कारी मानतात. त्यांना ठार करून हा प्रश्न सुटणार नाही. स्त्रीचा सन्मान प्रत्येक पातळीवर झाला पाहिजे. स्त्रीला दुय्यम मानण्याची वृत्ती संपली पाहिजे.
फरहा खान : आपला देश आता जंगली बनत आहे. बलात्काराच्या गुन्ह्य़ासाठी एकच सजा असली पाहिजे ती म्हणजे बलात्काऱ्याला नपुंसक बनविणे.