मदुराई उच्च न्यायालयात दावा
एका दलित मुलाला त्याने दिलेला अभ्यास (असाइनमेंट) पूर्ण न केल्यामुळे शिक्षा करण्यात आली होती, त्यामुळे त्याने वर्गातच विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला, यामुळे आपल्या मुलाचा मानसिक छळ झाला असून क्रूरतेची वागणूक दिली गेली, या मुद्दय़ावर वडिलांनी १० लाख रुपये भरपाईचा दावा मदुराई उच्च न्यायालयात दाखल केला आहे.
संजय या १४ वर्षांच्या नववीतील विद्यार्थ्यांला तो गुडालूर येथील खासगी शाळेत शिकत असताना शिक्षकांनी गृहपाठ न केल्याच्या कारणास्तव क्रूरपणे मारहाण केली होती. ही घटना गेल्या वर्षी २२ जुलैला घडली, परिणामी, या मुलाने विष घेतले व चक्कर येऊन पडला. शाळेने तो चक्कर येऊन पडल्याचे त्याच्या वडिलांना कळवले व त्याला रुग्णालयात दाखल केले. मुख्याध्यापकांसह तिघांनी त्याला मारहाण केली व इतर मुलांनाही त्याला मारण्यास सांगितले, त्यामुळे तो अपमानित झाला, त्याच्या मनावरही परिणाम झाला. पोलिसांनी सांगितले, की त्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती व मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे थेट प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले होते. शिक्षकांनी विद्यार्थ्यांला पालकांना घेऊन येण्यास सांगितले होते. सरकारच्या समाजकल्याण सचिवांकडे व सामाजिक न्याय विभागाच्या पोलीस महासंचालकांकडे तक्रार करूनही काहीच झाले नाही, केवळ गुन्हा दाखल करण्यात आला. त्यामुळे आपल्याला मुलाला झालेल्या त्रासाबाबत १० लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी वडिलांनी याचिकेत केली आहे. न्या. पुष्पा सत्यनारायण यांनी या प्रकरणाची सुनावणी २२ फेब्रुवारीला ठेवली आहे.