लोकसभा निवडणुकीचा निकाल अद्याप येणे बाकी असताना उत्तर प्रदेशातील काही दलितांनी पैशांसाठी मत विकण्यास नकार देत सर्वांसमोर एक उदाहरण दिलं आहे. एकीकडे दारु, पैसे, साड्यांच अमिष दाखवल्यावर लोक सहजपणे आपलं मत विकत असल्याची अनेक प्रकरणं समोर येत असताना चंदौली लोकसभा मतदारसंघातील सहा दलित समोर आले आहेत ज्यांना मतदान करु नये यासाठी पैशांची ऑफर देण्यात आली होती. तसंच धमकीही देण्यात आली होती. मात्र या सर्वांनी पैसे घेण्यास नकार दिला.

तुमचे पैसे परत घेऊन जा, आम्ही आमचं मत विकणार नाही असं पनारु राम यांनी गावातील माजी प्रमुख आणि भाजपा समर्थक छोटेलाल तिवारी याला सांगितलं. पनारु राम यांनी सांगितल्यानुसार, छोटेलाल तिवारी याने त्याच्या सहकाऱ्यासोबत जबरदस्तीने बोटावर शाई लावली आणि ५०० रुपयांची ऑफर दिली. तुम्ही उद्या लोकसभेसाठी मतदान करु नका अशी धमकीच देण्यात आली होती. मात्र पनारु राम यांनी आपण पैशांसाठी मत विकणार नाही असं स्पष्ट सांगितलं.

यानंतर सर्वांनी समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना यासंबंधी माहिती दिली. सपा कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याची मागणी केली. शेवटच्या टप्प्यात हे सर्वजण मतदान करण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या डाव्या हाताच्या बोटावर आधीच शाई लागली होती. पनारु राम सांगतात की, ‘उजव्या हाताच्या बोटावर असलेली शाई खोटी असून, डाव्या हाताच्या बोटावरील खरी आहे’.

चंदौलीचे एसपी संतोष कुमार सिंह यांनी इंडियन एक्स्पेसशी बोलताना सांगितलं की, ‘१८ मे रोजी तिवारी आणि त्याच्या सहकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे’. पोलिसांनी याप्रकरणी छोटेलाल तिवारीला अटक केली आहे.

याप्रकरणी छोटेलाल तिवारीचे सहकारी कटवारु आणि डिंपल फरार आहेत. मुगलसरायचे एसडीएम कुमार हर्ष यांनी सांगितल्यानुसार, ‘आम्ही प्रकरणाची दखल घेतली आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत आहेत’. दुसरीकडे स्थानिक भाजपा नेत्यांनी याचा आपल्याशी काही संबंध नसल्याचं म्हटलं आहे.

या सहा दलितांमध्ये ३८ वर्षीय नौरंगी देवी यांचाही समावेश आहे. ‘आम्ही झोपणार होतो इतक्यात गावाचे माजी प्रमुख पोहोचले. वीटभट्टीवर काम करणारे माझे पती बंसीधर राम त्यावेळी घरात होते. तिवारीने जमिनीवर ५०० ची नोट फेकली आणि काही कळायच्या आत बोटांवर शाई लावली’.

पुढे त्यांनी सांगितलं की, ‘समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेल्या आंदोलनानंतर मतदान देण्याची परवानगी देण्यात आली’. तिथेच राहणाऱ्या ४९ वर्षीय बादामी देवी यांनी सांगितलं की, ‘जेव्हा तिवारी घरात घुसले होते तेव्हा दोन सहकारी दरवाजावर उभे होते. माझ्या मुलीने मला आवाज दिला. पण मी जागेवरुन उठण्याआधी तिवारीने बोटावर शाई लावली आणि ५०० ची नोट देऊन चालू पडला’. रात्री १० वाजता सर्व गावकऱ्यांनी मिळून आंदोलनही केलं होतं. २०१४ रोजी भाजपाने ही लोकसभा जागा जिंकली होती.