गोव्यातील खाणींमध्ये उत्खननावर बंदी घालण्यात आल्यानंतर खनिजे आणि अन्य घटक तेथेच पडून असल्याने त्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण होण्याची भीती सरकारने व्यक्त केली आहे. राज्यातील खाणकाम बंद झाल्याने त्याचे विविध विपरीत परिणाम होत असल्याची माहिती मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राज्य विधानसभेत दिली. खाणीतील उत्खनन थांबविण्यात आल्याने आहे तशाच स्थितीत खनिजे आणि अन्य घटक तसेच पडून राहिल्याने पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. न्या. एम. बी. शहा आयोगाने बेकायदेशीरपणे खाणकाम सुरू असल्याकडे अंगुलीनिर्देष केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या सप्टेंबर महिन्यांत काम थांबविण्याचे आदेश दिले आणि मध्यवर्ती सक्षम समितीला आरोपांचा तपास करण्याचे आदेश दिले. खाण कामावर विपरीत परिणाम झाल्याने स्वामित्वधनाच्या रूपाने मिळणाऱ्या ५६४ कोटी रुपयांचा महसूलही बुडत असल्याचे पर्रिकर म्हणाले.