बिहारमध्ये आगामी काळात विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे प्रशानसन अधिकच सतर्क झाल्याचे दिसत आहे. निवडणूक काळात गोंधळ निर्माण करणाऱ्यांवर बारकाईने लक्षं ठेवलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर येथील दरभंगा पोलिसांचा एक नवा कारनामा समोर आला आहे. निवडणुक काळात गोंधळ निर्माण करण्याच्या शक्यतेवरून दरभंगा पोलिसांनी इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या ११ वर्षाच्या मुलास नोटीस पाठवली आहे. एवढेच नाहीतर पोलीस ठाण्यात त्याला बोलावून त्याच्याकडून ५० हजाराच बॉन्ड पेपर देखील भरवून घेतला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर एससपी बाबूराम यांनी आश्चर्य व्यक्त करत दोषी पोलिसांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

हे प्रकरण दरभंगामधील बहादुरपूर ठाण्याशी निगडीत आहे. रायसाहब पोखर येथे राहणाऱ्या चौथीतील ११ वर्षीय विद्यार्थ्यास पोलिसांनी निवडणुकी गोंधळ निर्माण करण्याच्या शक्यतेवरून नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळताच मुलासह संपूर्ण परिवारास धक्का बसला. यानंतर तो मुलगा स्वतः ठाण्यात हजर झाला मात्र पोलिसांनी मुलासह त्याच्या कुटुंबीयांचे म्हणने ऐकले नाही. अखेर मुलास ५० हजाराचा बॉन्ड पेपर लिहून द्यावा लागला. त्यानंतर संपूर्ण कुटुंब घरी परतलं आहे.

मुलाची आई सीमादेवी यांनी सांगितले आहे की, पोलीस ठाण्यातून शिपायाच्या हस्ते नोटीस पाठवली गेली होती. ज्यामध्ये माझ्या मुलाबद्दल बुथ लुटण्याचा व निवडणुकीत गोंधळ निर्माण करण्याची शक्यता वर्तवली गेली होती. नोटीस मिळाल्यानंतर आम्हाल सर्वांना धक्का बसला, की चौथीतील मुलगा असं कसं काय करण्याची शक्यता आहे. मात्र, तरी देखील पोलीस ठाण्यात जाऊन आम्ही कायद्यानुसार सर्व प्रक्रिया पार पाडली आहे.