आईवडिलांच्या संपत्तीच्या हव्यासापोटी मुलीने संपूर्ण कुटंबाची हत्या केल्याची घटना उत्तराखंडमध्ये घडली आहे. तब्बल १६ महिन्यांनी या हत्येचा उलगडा झाला आहे. उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे ही घटना घडली आहे. वडिलांच्या नावाने असणारी जमीन आणि घर बळकावण्यासाठी मुलीने तिच्या नवऱ्याच्या आणि भाडेकरूच्या मदतीने आईवडिल आणि दोन बहिणींची हत्या केली. वडील हिरालाल, आई हेमवती आणि बहिणी पार्वती व दुर्गा या चारही जणांचे मृतदेह घरात पुरले आणि त्यावर नविन लादी बसवली.

हत्येच्या १६ महिन्यानंतर या चौघांचे मृतदेह हाती लागले. हिरालाल यांचा जावई आणि मुलगी जेव्हा त्याचे मृत्यूप्रमाण पत्र बनवण्यासाठी व जमिन नावावर करण्यासाठी प्रयत्न करू लागले तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. जमिनीचा सांभाळ करणाऱ्या व्यक्तीने हिरालाल यांच्या सोबत कुंटुबातील चार जण बेपत्ता असल्याची तक्रार रुद्रपूर पोलिस ठाण्यात नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी हिरालाल यांच्या जावई आणि मुलीला ताब्यात घेवून चौकशी केली असती त्यांनी केलेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली व गुन्हा कबुल केला.

पोलिसांनी घटनास्थळी जावून खोदल्यावर चारही मृतदेह हाती लागले. हिरालाल २००६ पासून राजा कॉलनी ट्रान्झिस कॅम्प येथे राहत होते. गावी असलेल्या १८ एकर जमिनीपैकी ५ एकर विकून त्यांनी येथे घर घेतले होतं. दरम्यान, पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे व पुढील तपास सुरू आहे.