भारत आणि न्यूझीलंड दरम्यान बुधवारी झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामान्यात भारताचा पराभव झाला. याबरोबरच कोट्यावधी भारतीयांचे विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. अनेकांनी विविध माध्यमातून आपल्या भावनाही व्यक्त केल्या. मात्र, भारताच्या पराभवाचे दुःख पचवणे अशक्य झाल्याने बिहारमधील एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. तर, ओदिशातील एका युवकाने चक्क विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

बिहारमधील किशनगंज येथील एका व्यक्तीचा भारत – न्यूझीलंड दरम्यान खेळला गेलेला उपांत्य सामना पाहताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. याबाबत डॉक्टरांनी सांगितले की, त्या व्यक्तीला अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याच्या कुटूंबीयांनीच रूग्णालयात आणले होते. कुटूंबीयांचे म्हणने आहे की, ते हा सामना पाहात होते या दरम्यान ते उत्साही देखील झाले होते, यातुनच त्यांना धक्का बसला असावा.

तर ओदिशातील धरमगढ येथील एका युवकाने भारताचा पराभव झाल्यानंतर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. याबाबत मुख्य जिल्हा वैदकीय अधिकारी बनलता देवी यांनी सांगितले की, त्याच्या पोटात विष असल्याचे निदान झाले आहे. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असुन त्याच्या जीवाल कोणताही धोका नाही.

विश्वचषकातील भारताच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या लढाऊ वृत्तीबद्दल पंतप्रधान मोदींनी कौतुक केले आहे. तर दुसरीकडे महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीच्या बातम्या माध्यमांवर फिरू लागल्याने लता मंगेशकर यांनी धोनी तुझी देशाला गरज असल्याचे म्हटले आहे.