चिमुरड्यांवर होत असलेल्या बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर हरयाणा विधानसभेनेही गुरुवारी ऐतिहासिक कायद्याला मंजूरी दिली. त्यानुसार, आता हरयाणात जर कोणी १२ वर्षांखालील मुलीवर बलात्कार केला तर त्याला आपल्या जीवाला मुकावे लागणार आहे. कारण या अमानुष गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार आहे. मध्यप्रदेश आणि राजस्थाननंतर हरयाणा असा कायदा करणारे तिसरे राज्य ठरले आहे.


हरयाणात गेल्या काही काळापासून अल्पवयीन आणि चिमुरड्या मुलींवर बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. यामुळे हरयाणा सरकारला टीकेला सामोरे जावे लागत होते. एकदिवसापूर्वीच रोहतकमधील एका विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.

त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीला हरयाणातील एका गावात सहा वर्षांच्या एका मुलीवर गावातच राहणाऱ्या एका तरुणाने अत्याचार केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, ही चिमुरडी आपल्या घराजवळ खेळत होती. त्याचवेळी एक २७ वर्षीय तरुण तेथे आला आणि त्या मुलीला शेतात घेऊन गेला. तेथे त्याने त्या मुलीवर अत्याचार केला आणि पुन्हा तिला आपल्या घरी सोडून निघून गेला.

सोनीपतमध्ये देखील एका दहावीच्या मुलीला परिक्षेत पास करतो असे सांगून शाळेच्या मुख्याध्यापकाने तिच्या बलात्कार केला होता. या मुख्याध्यापकाने संबंधीत विद्यार्थीनीच्या जागी दुसऱ्या मुलीला परिक्षेला पाठवले आणि या मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर अत्याचार केला होता.

तसेच गुरुग्राममध्येही एका मोठ्या हॉटेलमध्ये विवाह समारंभादरम्यान एका ४ वर्षांच्या मुलीवर अत्याचराराची घटना घडली होती. एका डीजेने या मुलीवर अतिप्रसंग केला होता. या कार्यक्रमात पीडीत मुलगी चुकून पुरुषांच्या स्वच्छतागृहात गेली होती. तिथे तिच्यावर डीजेने अत्याचार केला होता.

हरयाणात घडत असलेल्या अशा घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यासाठी हा कायदा आणण्यात आला आहे.