देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या १.४१ लाखांपर्यंत कमी झाली असून, एकूण करोनाबाधितांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १.३० टक्के आहे.

गेल्या २४ तासांमध्ये ३३ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांत ५ हजारांहून कमी उपचाराधीन रुग्णांची नोंद झाली. दमण व दीव आणि दादरा-नगर हवेली येथे सध्या करोनाचा एकही रुग्ण नाही, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी सांगितले.

गेल्या २४ तासांत ११०६७ बाधितांची नोंद झाली, तर १३०८७ रुग्ण करोनामुक्त झाले. एकूण उपचाराधीन रुग्णांमध्ये केरळ व महाराष्ट्र या दोन राज्यांतील सर्वाधिक ७१ टक्के रुग्णांचा समावेश आहे.

गेल्या २४ तासांत उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थान, ओडिशा, आंध्र प्रदेश, झारखंड, पुदुच्चेरी, मणिपूर, नागालँड, मेघालय, सिक्किम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा ही राज्ये आणि जम्मू- काश्मीर, लक्षद्वीप, अंदमान व निकोबार बेटे, लडाख व दमण- दीव हे केंद्रशासित प्रदेश यांत एकही मृत्यू नोंदवला गेला नाही.

देशात करोनातून बरे झालेल्यांची एकूण संख्या १,०५,६१,६०८ वर पोहोचली आहे. १० फेब्रुवारीला सकाळी ८ वाजेपर्यंत देशव्यापी लसीकरण कार्यक्रमांतर्गत ६६ लाखांहून अधिक लोकांना लस देण्यात आली.

दिवसभरात ११,०६७ जणांना करोना संसर्ग

* गेल्या २४ तासांत देशात आणखी ११०६७ लोकांना करोनाचा संसर्ग झाल्यामुळे, बाधितांची एकूण संख्या १,०८,५८,३७१ इतकी झाली आहे. मात्र करोनाबळींची संख्या सलग पाचव्या दिवशी शंभरहून कमी होती.

* आणखी ९४ लोकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने, करोनाबळींची एकूण संख्या १,५५,१२२ इतकी झाल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

* करोना संसर्गातून बरे झालेल्यांची संख्या १,०५,६१,६०८ इतकी झाली असून, हे प्रमाण ९७.२ टक्के इतके झाले. याचवेळी, करोनाचा मृत्युदर १.४३ टक्के इतका आहे.