हिंसाचाराला चिथावणी देऊन शेतकरी आंदोलनाला बदनाम केल्याचा संयुक्त किसान मोर्चाने केलेला आरोप दीप सिद्धूने फेटाळून लावला. त्याने सोशल मीडियावरुन लाईव्ह करुन आपली बाजू मांडली. “मी गुपित सांगायला सुरुवात केली, तर संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांना कुठे लपायच ते समजणार नाही” असे दीप सिद्धू म्हणाला. अभिनयाकडून सामाजिक कार्यकर्ता बनलेल्या दीप सिद्धूला शेतकरी ट्रॅक्टर मोर्चातील हिंसाचारासाठी जबाबदार धरण्यात येत आहे. त्याच्यावर हिंसाचाराला चिथावणी दिल्याचा आरोप होत आहे.

“तुम्ही निर्लज्जपणे मला जबाबदार धरताय. तुमच्या निर्णयाच्या आधारावर लोक संकल्प करुन, ट्रॅक्टर मोर्चासाठी दिल्लीत आले होते. लोक तुमचा शब्द मानतात. लाखो लोक माझ्या नियंत्रणाखाली कसे राहू शकतात? मी लाखो लोकांना चिथावणी देऊ शकतो, मग तुमचं महत्त्व काय ? दीप सिद्धूला कोणी मानत नाही, त्याचं योगदान नाही. मग मी लाखो लोकांना घेऊन तिथे आलो, हे तुम्ही कसं म्हणू शकता?” असा सवाल दीप सिद्धूने केला. सोशल मीडियावरुन लाईव्ह करताना सिंघू सीमेच्या जवळ असल्याचे त्याने सांगितले.

Video : दिल्लीत शेतकरी विरुद्ध स्थानिकांमध्ये संघर्षाचा भडका; पोलीस अधिकाऱ्यावर तलवारीने हल्ला

प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसाचारा प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये दीप सिद्धूचे नाव आहे. लाल किल्ल्यावर हिंसाचार झाल्याचे त्याने अमान्य केले. निषेधापेक्षा तिथे असलेल्या आंदोलकांना पाठिंब्याची आवश्यकता आहे असे तो म्हणाला.

दीप सिद्धूवर काय आरोप आहे?
दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावल्याचा आरोप भारतीय किसान युनियनचे हरयाणातील प्रमुख गुरनाम सिंह चाडूनी यांनी केला. खरंच दीप सिद्धू याने शेतकऱ्यांना भडकावलं का आणि तो कोण आहेत, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
ध्वज फडकावणाऱ्या शेतकऱ्यांना पंजाबी गायक दीप सिद्धू याने भडकावल्याचा आरोप शेतकरी नेत्यांनी केला आहे. “दीप सिद्धूने शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं आणि त्यांना लाल किल्ल्याकडे घेऊन गेला. शेतकऱ्यांची लाल किल्ल्याकडे जाण्याची अजिबात इच्छा नव्हती,” असं गुरनाम सिंह चाडूनी यांनी म्हटलं आहे. स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांनीही दीप सिद्धू याला लाल किल्ल्यावरील घटनेसाठी जबाबदार ठरवलं आहे.