अयोध्येत ५ लाख ८४ हजार ५७४ दिव्यांनी प्रभू रामचंद्रांची अयोध्या उजळून निघाली. एवढ्या मोठ्या प्रमाणात पणत्या लावण्याचा या विक्रमाची नोंद थेट गिनीजबुकात झाली आहे. प्रभू रामचंद्रांची दिव्यांनी उजळलेली अयोध्या आणि डोळ्याचं पारणं फेडणारा हा उत्सव पाहून भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. आपण सगळ्यांनी करोनाच्या गाइडलाइन पाळून दीपोत्सव साजरा केला आहे. आता प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभारतानाही ‘दो गज की दुरी मास्क है जरुरी’ हा मंत्र पाळू असं आवाहन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दीपोत्सवाचा पहिला दिवा लावून या उत्सवाला सुरुवात केली. शरयू नदीच्या काठावर ५ लाख ८४ हजार ५७४ दिवे लावण्यात आले. तेलाच्या पणत्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर लावून दिवाळी साजरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. काही महिन्यांपूर्वीच राम मंदिराचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या दिवाळीला विशेष महत्व आहे. त्याच पार्श्वभूमीवर अयोध्येत ५ लाख ८४ हजारांपेक्षा जास्त दिवे प्रज्वलित करण्यात आले.

दिवाळीनिमित्त अयोध्येत दीपोत्सव तर साजरा करण्यात आलाच शिवाय रामायणावर आधारित लेझर शोचंही आयोजन करण्यात आलं आहे. प्रभू रामचंद्रांचं एक भव्य मंदिर अयोध्येत उभारलं जावं ही गेल्या अनेक पिढ्यांची इच्छा होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात प्रभू रामचंद्रांचं मंदिर उभं राहतं आहे ही बाब अभिमानाची आहे असंही योगी आदित्यनाथ यांनी यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात म्हटलं आहे.