पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेला तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरु असताना काल रात्री भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये भारतीय सैन्याच्या दोन जवानांसह एक अधिकारी असे तीन जण शहीद झाले.

भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री ही चकमक झाली. या घटनेमुळे पुन्हा एकदा चीनला लागून असलेल्या सीमेवर तणाव निर्माण झाला आहे.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेतली. नेमकं काल रात्री काय घडलं? याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

भारतीय लष्कराकडून यासंबंधी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. यानुसार, गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री दोन्ही देशांच्या सैन्यात आपापसात भिडले. यामध्ये भारताचा एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. यानंतर दोन्ही देशांमधील वरिष्ठ अधिकारी तणाव वाढू नये यासाठी आपापसांत चर्चा करत आहेत.

दरम्यान भारतीय लष्कराच्या जवानांनी दोन वेळा सीमारेषा ओलांडली आणि सैन्यावर हल्ला केला असा दावा चीनच्या ग्लोबल टाइम्सने परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्याने केला आहे. यानंतर दोन्ही देशांचे सैन्य आपापसांत भिडले असंही त्यांनी सांगितलं आहे. यानंतर चीनने भारतीय अधिकाऱ्यांकडे निषेध नोंदवला असून सीमेवरील परिस्थिती बिघडेल असं काही करु नये असं म्हटलं आहे.