श्रीनगर विमानतळावर रात्रीची प्रवासी विमान वाहतूक सुरू करण्याला संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी देण्यात आली आह़े  परंतु, ही सेवा प्रत्यक्षात सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा सध्या उपलब्ध नसल्याने ही सेवा सुरू व्हायला आणखी काही कालावधी लागण्याची शक्यता जम्मू-काश्मीर शासनाने वर्तविली आह़े
येथील भारतीय वायूसेनेच्या देखरेखीखाली असलेल्या शेख- उल- आलम विमानतळावर रात्री दहा वाजेपर्यंत विमान वाहतुकीस परवानगी देण्यात आली आह़े  मात्र सध्या या विमानतळावरील शेवटचे विमान पाच वाजताचे असत़े  तर सकाळी ही वाहतूक सात वाजता सुरू होत़े  दिवसभरातील या कालावधीत २५ विमानांची आणि सुमारे चार हजार प्रवाशांची वाहतूक या विमानतळावरून होत़े  श्रीनगर विमानतळावर रोज रात्री दहा वाजेपर्यंत प्रवासी विमानांवर देखरेख ठेवण्याच्या सूचना हवाई वाहतूक मुख्यालयाला देण्यात आल्याचे या संदर्भात संरक्षणमंत्री ए़ के . अ‍ॅण्टनी यांनी सांगितल़े  पर्यटन आणि उद्योगांना चालना देण्यासाठी राज्य आणि केंद्रातील नेत्यांकडून ही मागणी करण्यात येत असल्याचे समजत़े