कालपरवा राजकारणाच्या आखाडय़ात दाखल झालेल्या आम आदमी पक्षाने काँग्रेस व भारतीय जनता पक्षाची दिल्लीत चांगलीच कोंडी केली आहे. राज्यात सरकार स्थापनेसाठी आम आदमी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देण्याची घोषणा करणाऱ्या काँग्रेसवर अरविंद केजरीवाल यांनी जनलोकपाल विधेयकाचे ब्रह्मास्त्र सोडले आहे. दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाच्या जन लोकपाल विधेयकाला पाठिंबा, या अटीवरच सत्तास्थापनेत तुमचे सहकार्य घेऊ, अशी भूमिका घेऊन केजरीवाल यांनी काँग्रेसची गोची केली आहे. केजरीवाल यांची मागणी मान्य केल्यास संसदेत सादर होणाऱ्या लोकपाल विधेयकामध्येही सरकारला बदल करावे लागतील.
पुढील आठवडय़ात संसदेत लोकपाल विधेयकावर चर्चा होणार आहे. या विधेयकाला आम आदमी पक्षाचा विरोध आहे. आम आदमी पक्षाचे आराध्य अण्णा हजारे यांचे राळेगणसिद्धीला उपोषण सुरु आहे. त्यामुळे केजरीवाल यांची अट मान्य केल्यास दिल्ली विधानसभेत सक्षम जनलोकपाल तर संसदेत कमकूवत लोकपाल विधेयकाला पाठिंबा, अशी दुहेरी कोंडी काँग्रेसची होईल. काँग्रेसच्या प्रस्तावावर आम आदमी पक्षाची शुक्रवारी दिल्लीत बैठक झाली. या बैठकीस अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, मनीष सिसोदिया, कुमार विश्वास उपस्थित होते. आम आदमी पक्षाचे जनलोकपाल तर काँग्रेसचे लोकपाल, असा हा वाद आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभेत आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला तर केंद्रातदेखील त्यांचेच म्हणणे ऐकावे लागेल, अन्यथा दुटप्पीपणाची टीका होईल, अशी भीती आता काँग्रेसला वाटू लागली आहे. आम आदमी पक्षाला दिल्लीत पाठिंबा म्हणजे ‘हात’ दाखवून अवलक्षण, अशी स्थिती काँग्रेसची झाली आहे. काँग्रेसचे दिल्ली प्रभारी शकील अहमद वगळता पक्षाच्या एकही ज्येष्ठ नेत्याने आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला.
सरकार स्थापन करायचेच झाल्यास २९ डिसेंबरला विधानसभेच्या पहिल्या दिवसाचे कामकाज रामलीला मैदानावर होईल, अशी मागणी आम आदमी पक्षाने पुढे केली आहे.  याचा घटनात्मक अभ्यास केल्याचा दावा आम आदमी पक्षाचे नेते करीत आहेत. रामलीला मैदानावर मंडप टाकून विधानसभेचे कामकाज होईल. एरव्ही चालते तसेच काम परंतु ते लोकांच्या समक्ष रामलीला मैदानावर व्हावे, असा केजरीवाल व त्यांच्या सहकार्याचा आग्रह आहे. या जनविधानसभेत सरकारचा शपथविधी व्हावा, असेही केजरीवाल यांचे म्हणणे आहे.