नवी दिल्ली : पंजाब व हरयाणात शेतकचरा जाळणे बंद होऊनही दिल्लीत हवेचे प्रदूषण गंभीर पातळीवर असल्याचे पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शुक्रवारी सांगितले. दिल्लीतील केजरीवाल सरकारने केंद्रीय प्रदूषण मंडळाने केलेल्या तक्रारींकडे लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.

ते म्हणाले, की जैवभार व कचरा जाळण्याच्या तक्रारी आल्या असून कचऱ्याची चुकीच्या पद्धतीने विल्हेवाट लावली जात आहे. त्यात कचरा विल्हेवाट नियमांचा भंग करण्यात आला आहे. रस्त्यावरील धुळीनेही प्रदूषण होत आहे. रस्त्यांची अवस्थाही चांगली नाही.

जावडेकर यांनी सांगितले, की केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्ली सरकारकडे तक्रार केली असून त्यावर तातडीने कारवाई करण्याची करण्यात यावी.  दिल्लीतील प्रदूषण पातळी शेतकचरा जाळला जात नसतानाही गंभीर असून अजूनही हवेचा दर्जा ‘अति खराब’ पातळीवर आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पन्नास पथकांनी दिल्ली व राजधानी दिल्ली परिसरात विविध ठिकाणी पाहणी केल्यानंतर या तक्रारी केल्या आहेत.