दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज सर्व अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी दिल्लीतल्या लसीकरणासंदर्भात चर्चा केली. या बैठकीबद्दल केजरीवाल यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण पुढच्या तीन महिन्यात पूर्ण करण्यासाठीचा आराखडा तयार केल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रे उभारण्यात येणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर सर्व पात्र व्यक्तींनी पुढे येऊन लस घेण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.
यापूर्वी देशातील करोना संकट पाहता दिल्ली सरकारनं १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली होती.

लसीकरण वेगाने व्हावं यासाठी दिल्ली सरकारने १.३४ कोटी लसींची ऑर्डर दिली आहे. १ मे पासून दिल्लीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केलं जाईल असंही मुख्यमंत्री केजरीवाल यांनी सांगितलं होतं. मोफत लसीकरणाचा दिल्लीतील सामान्य जनतेला फायदा होईल असंही त्यांनी पुढे सांगितलं.

यावेळी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लसींच्या दरावरून टीकेची झोड उठवली होती. केंद्र, राज्य आणि खासगी रुग्णालयांना एकाच किंमतीत लस मिळाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी केली होती. लस निर्मिती करण्य़ाऱ्या कंपन्याचा दावा आहे की, १५० रुपये फायदा होतो. मग वेगवेगळे दर का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. नफा कमवण्यासाठी पूर्ण आयुष्य पडलं आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. तसेच केंद्र सरकारने यात दखल घेत दर निश्चित केले पाहिजेत अशी सूचनाही केली.