उत्तर प्रदेशमधील अलीगढ येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या हत्येसंबंधी दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून याप्रकरणातील आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली जावी अशी मागणी केली आहे.

अलीगढच्या टप्पल भागात पैशांच्या देवाणघेवाणीतुन झालेल्या वादात अडीच वर्षांच्या मुलीची हत्या करून, तिचा मृतदेह कचराकुंडीत फेकण्यात आला होता. मृत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आलेली आहे.

स्वाती मालीवाल यांनी पत्रात म्हटले आहे की, अलीगढच्या घटनेतील गुन्हेगारांना दोन महिन्यांच्या आत फाशीची शिक्षा सुनावली जावी, ज्यामुळे संपूर्ण देशात एक मार्मिक संदेश जाईल. शिवाय त्यांनी ही देखील मागणी केली आहे की, अपराध संशोधन कायदा २०१८ ची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जावी.

डीजीपी आनंद कुमार यांनी सांगितले आहे की, या प्रकरणाचा जलदगतीने सखोल तपास करण्यासाठी एक पथक तयार करण्यात आलेले आहे. आरोपींवर पॅाक्सो कायद्यानुसार कारवाई केले जाणार आहे.