लग्नाला नकार दिला म्हणून दिल्ली पोलीस दलातील एका वाहतूक पोलीस निरीक्षकाने महिलेच्या आणि तिच्या प्रियकराची गोळया झाडून हत्या केली. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी आरोपी दिनेश कुमार आणि त्याच्या साथीदाराला शनिवारी अटक केली. दिनेश कुमार सीमापुरी भागात तैनात होता.

दिनेशने पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार त्याचे प्रिती (३२) नावाच्या महिलेबरोबर संबंध होते. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. पण प्रितीने त्याचा प्रस्ताव नाकारला व अन्नू चौहान बरोबर तिला लग्न करायचे असल्याचे सांगितले. २५ मार्चला प्रिती आणि अन्नू मंदिरामध्ये गेले होते.

मंदिराबाहेर येत असताना दिनेशने त्याच्या रिव्हॉलव्हरमधून प्रिती आणि अन्नूवर गोळया झाडल्या. दोघांचा जागीच मृत्यू झाला. प्रितीने तिचा फोन नंबर बदलला व त्याच्या बरोबर सगळे संबंध तोडल्याचा दिनेशच्या मनात राग होता असे पोलिसांनी सांगितले.

प्रिती आपल्याकडे दुर्लक्ष करत होती व तिने फोन नंबर बदलल्यामुळे तिच्याशी संपर्क साधता येत नव्हता तसेच दुसऱ्याबरोबर ती लग्न करणार याचा राग मनामध्ये होता असे दिनेशने पोलीस चौकशीत सांगितले. दिनेश प्रितीचा दूरचा नातेवाईक होता. दिनेश दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल म्हणून १९९४ साली रुजू झाला होता. २००८ साली हेड कॉन्स्टेबलपदी त्याचे प्रमोशन झाले. २०१६ मध्ये पुन्हा बढती मिळाल्यानंतर तो पोलीस निरीक्षक झाला.