पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीचे मतदान संपल्यावर आता रविवारी निकालाची प्रतीक्षा आहे. मात्र विविध संस्थांच्या मतदानोत्तर चाचण्यांमध्ये भाजपची सरशी होईल असे भाकीत वर्तविण्यात आले आहे. काँग्रेसने या चाचण्यांना काहीच अर्थ नसल्याचे म्हटले आहे. हा कल पाहून काँग्रेसचे नीतिधैर्य खचल्याचा टोला भाजपने लगावला आहे.
मतदानोत्तर चाचण्यांना काही मर्यादा असल्याचे मान्य केले तरी कल स्पष्ट  होण्यास त्या पुरेशा असतात, असे भाजप नेते अरुण जेटली यांनी सांगितले. मात्र मतदानोत्तर चाचण्या पाहून काँग्रेस नेते इतका थयथयाट करतात तर प्रत्यक्ष निकाल आल्यावर काय होईल याची कल्पना करतच  नाही अशा शब्दात जेटलींनी काँग्रेसच्या मतदानोत्तर चाचण्यांवरील आरोपाचा समाचार घेतला. काँग्रेसने वस्तुस्थिती समजावून घेतली नाही तर त्यांना चुकांचे उत्तर कसे सापडणार? काँग्रेसने याबाबत आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला जेटलींनी दिला. एखाद्या घराण्याचा करिष्मा प्रदीर्घ काळ टिकू शकत नाही, त्याच्या राजकारणाला मर्यादा आहेत असे जेटलींनी काँग्रेसला सुनावले. अर्थात याबाबत विचार करण्याची काँग्रेसची परंपरा नाही असा टोलाही त्यांनी लगावला. प्रत्यक्ष निकाल रविवारी जाहीर होणार आहे. तो पर्यंत वाट पहा असा सल्ला नेते देत आहेत.
चाचण्यांचे कल दिग्विजय सिंग यांना अमान्य
भोपाळ:अलीकडेच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत काँग्रेसपेक्षा भाजपला अधिक यश मिळेल, असा मतदानोत्तर निष्कर्ष विविध वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आला. तो निखालस खोटा असल्याचा दावा काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंग यांनी केला आहे.अशा प्रकारच्या मतदानोत्तर चाचण्यांच्या निकालांना काहीही अर्थ नसतो, हे निकाल कचऱ्याच्या टोपलीत टाकण्याच्या लायकीचेच असतात, असे दिग्विजय सिंग म्हणाले. मतदानोत्तर निष्कर्ष हे विष्टद्धr(२२४)वास ठेवण्यासारखे नसतात आणि त्यामध्ये चुकाही होऊ शकतात, असे त्यांचे पुत्र जयवर्धन म्हणाले.पीएमटी घोटाळ्याबाबत विचारले असता दिग्विजय सिंग यांनी, सत्तारूढ भाजप सर्व आरोपींना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला. काँग्रेस सत्तेवर आल्यास या प्रकरणाची सीबीआय चौकशी केली जाईल, असेही ते म्हणाले.दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनीही मतदानोत्तर चाचण्या फेटाळून लावल्या. आपला यावर विश्वास नाही. आपण निश्चिंत आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी  दिली. काँग्रेसच्या इतर नेत्यांनीही मतदानोत्तर चाचण्या फेटाळून लावल्या आहेत. मध्य प्रदेश विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनीही या चाचण्यांवर विश्वास नसल्याचे म्हटले आहे.