नवी दिल्ली : येथील बवाना औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या एका प्लॅस्टिक गोदामाला शनिवारी संध्याकाळी आग लागल्याची दुर्घटना घडली होती. या आगीत १७ व्यक्तींचा होरपळून मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आता गोदामाचा मालक मनोज जैन याला दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.


प्राथमिक माहितीनुसार, बावना औद्योगिक वसाहतीमधील तीन कारखान्यांना आग लागली. फटाके, प्लास्टिक आणि कार्पेटच्या तीन कारखान्यांमध्ये ही आग भडकली. यावेळी कारखान्यांत अनेक कामगार अडकून पडल्याने मृतांचा आकडा वाढत गेला. आगीची वर्दी मिळाल्यानंतर अग्निशामन दलाच्या १० गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तब्बल तीन तासांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्यांनी आग नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.

दिल्लीतील गोदामाला लागलेल्या आगीत १७ जणांचा मृत्यू होणं हे खूपच दुर्देवी असून दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी भादंवि ३०४, २८५ आणि एक्सप्लोजिव अॅक्ट अंतर्गंत गुन्हा दाखल केला आहे. तसेच १ जानेवारी रोजी ज्या मालकाने ही जागा भाड्याने घेतली होती त्यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या गोदामामध्ये अनधिकृतरित्या प्लॅस्टिक उद्योगाचे काम सुरु होते, अशी माहिती दिल्ली पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी दिपेंद्र पाठक यांनी सांगितले.