दिल्लीत चौथ्यांदा लॉकडाउनचा अवधी वाढवण्यात आला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसात दिल्लीत करोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. मात्र करोना पूर्णपणे गेलेला नाही याची पूर्ण जाणीव मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आहे. त्यामुळे मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्यांनी लॉकडाउनचा अवधी आणखी एक आठवडा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

दिल्लीतील लॉकडाउनचा अवधी १७ मे रोजी संपणार होता. मात्र तत्पूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत अजून एक आठवडा लॉकडाउन असेल असं जाहीर केलं आहे. आता २४ मे पर्यंत दिल्लीत लॉकडाउन असणार आहे. गेल्या आठवड्यात लागू असलेले निर्बंध या आठवड्यातही लागू असणार आहेत. मेट्रो आणि सार्वजनिक ठिकाणी लग्न समारंभावर निर्बंध तसेच राहणार आहेत.

‘करोनाचं संकठ मोठं आहे. लोकं दु:खी आहेत. ही वेळ एकमेकांवर बोट उचलण्याची नाही. तर एकमेकांना मदत करण्याची आहे. माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, त्यांनी लोकांची मदत करावी’, असं आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप कार्यकर्त्यांना केलं आहे.

देशात करोना मृत्यूचं थैमान! २४ तासांत चार हजारांपेक्षा अधिक करोनाबळी

दिल्लीत गेल्या २४ तासात ६,४३० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३३७ जणांना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. ७ एप्रिलनंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत १३ लाख ८७ हजार ४११ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर २१ हजार २४४ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.