X
X

रामदेव बाबांना कोर्टाचा पुन्हा दणका, साबणानंतर पतंजली च्यवनप्राशच्या जाहिरातीला स्थगिती

READ IN APP

डाबरने पतंजलीकडे २.०१ कोटी रूपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे

साबणानंतर आता पतंजलीच्या च्यवनप्राशच्या जाहिरातीलाही न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने रामदेव बाबांच्या पतंजली आयुर्वेद लि.च्या च्यवनप्राशच्या जाहिराती प्रकाशित किंवा प्रसारित करण्यास स्थगिती दिली आहे. ही कारवाई पतंजलीची प्रतिस्पर्धी कंपनी डाबरच्या तक्रारीनंतर करण्यात आली. पतंजलीच्या जाहिरातीत आमच्या ब्रँडला कमी लेखण्यात येत असल्याची तक्रार डाबरने केली होती.

न्या. गीता मित्तल आणि न्या. सी.हरी शंकर यांच्या पीठाने आपल्या अंतरिम आदेशात पतंजलीला दि. २६ सप्टेंबरपर्यंत कोणत्याही माध्यमातून च्यवनप्राशची जाहिरात करण्यास मनाई केली आहे. दि. २६ रोजी या प्रकरणी पुढील सुनावणी होईल. प्राथमिकदृष्टया आम्हाला याप्रकरणी अंतरिम संरक्षणाची आवश्यकता वाटते, असे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे. या पीठाने पतंजली आयुर्वेदला डाबर इंडियाच्या याचिकेवर नोटीस जारी करत उत्तर मागितले आहे.

पतंजलीच्या जाहिरातीवर स्थगितीशिवाय डाबरने पतंजलीकडे २.०१ कोटी रूपयांची नुकसान भरपाईही मागितली आहे. यापूर्वी न्यायालयाने पतंजलीच्या जाहिरातीला स्थगिती देण्यास नकार दिला होता. त्यानंतर दोन न्यायाधीशांच्या पीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती.

त्याचबरोबर दिल्ली उच्च न्यायालयाने डेटॉल बनवणाऱ्या रॅकेट बेनकिसेरच्या तक्रारीवरून पतंजलीच्या साबणाच्या जाहिरातीला स्थगिती दिली आहे. रामदेव बाबांच्या कंपनीची ही जाहिरात रॅकेटच्या डेटॉल ब्रँडची प्रतिमा मलीन करता असल्याचा दावा करण्यात आला आहे. यापूर्वी एचयूएलनेही या जाहिरातीवर स्थगितीची मागणी केली आहे.

रॅकेट बेनकिसेरच्या मते, जाहिरातीत दाखवण्यात आलेला साबण हा आकाराने आणि रंगाने आमच्या उत्पादनासारखा आहे. त्याचबरोबर त्याला ‘ढिटॉल’ असे संबोधण्यात आले आहे. रॅकेटचे वकील नॅन्सी रॉय म्हणाले, न्यायालयाने या जाहिरातीलव अंतरिम स्थगिती दिली आहे. पतंजलीने सुरूवातीला ही जाहिरात यूट्यूबवर अपलोड केली. त्यानंतर त्याचे वाहिन्यांवरून प्रसारण सुरू केले.

21
X