पीटीआय, विजयपुरा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधानांवर जोरदार टीका केली. पंतप्रधान घाबरले असून ते मंचावर अश्रूही ढाळतील, असे राहुल गांधी म्हणाले.

कर्नाटकातील विजयपुरा जिल्हा मुख्यालयातील पक्षाच्या सार्वजनिक मेळाव्याला संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. नुकत्याच झालेल्या प्रचारसभांमध्ये मोदींनी ‘मंगळसूत्र’, ‘संपत्तीचे पुनर्वितरण’ आणि ‘वारसा कर’ यांसह विविध मुद्दय़ांवरून काँग्रेसला लक्ष्य केले. यावर राहुल गांधी यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली. ‘‘पंतप्रधान तुमचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहेत. भारतात गरिबी, बेरोजगारी आणि महागाई हे प्रमुख मुद्दे असताना मोदी यांवर काहीही न बोलता विविध माध्यमांतून जनतेचे लक्ष विचलित करत आहेत. तुम्ही पंतप्रधानांची भाषणे ऐकली तर तुमच्या लक्षात येईल ते घाबरले आहेत. हे शक्य आहे की ते व्यासपीठावर अश्रू ढाळतील, असे राहुल गांधी म्हणाले. केवळ काँग्रेसच बेरोजगारी दूर करू शकते, महागाई रोखू शकते आणि जनतेला त्यांचा योग्य वाटा देऊ शकते, असा दावा गांधींनी केला.

हेही वाचा >>>आईने कडक उपवास करायला लावल्याने दोन भावांचा मृत्यू? दिवसाला केवळ एक खजूर खायचे; गोव्यातील खळबळजनक घटना

‘‘मोदींनी फक्त गरिबांचे पैसे हिसकावले आहेत. त्यांनी काही जणांना अब्जाधीश बनवले आहे. देशातील ७० कोटी लोकांइतकी संपत्ती केवळ २२ लोकांकडे आहे. देशाच्या ४० टक्के संपत्तीवर फक्त एक टक्के लोकांचा ताबा आहे,’’ असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

‘अग्निवीर योजना रद्द करणार’

काँग्रेस जर सत्तेवर आला तर अग्निवीर योजना रद्द करण्यात येईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. सशस्त्र दलात १८ ते २१ वर्षे वयोगटातील तरुणांना तीन वर्षे सेवा देणारी ‘अग्निवीर’ योजना लष्कर आणि सैनिकांचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे.