News Flash

ऑक्सिजन पुरवठ्यासाठी पुढाकार घेणाऱ्या टाटांचं न्यायालयाकडून कौतुक; मोदी सरकारच्या नियोजनावर मात्र ताशेरे

"टाटा सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करतात, केंद्राकडे तर..."

(फोटो सौजन्य: पीटीआय आणि फेसबुकवरुन साभार)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये देशातील अनेक भागांमध्ये आरोग्य सेवांचा तुटवडा जाणवू लागला आहे. खास करुन ऑक्सिजनची मागणी मागील काही दिवसांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढली आहे. रुग्णांना पुरश्याप्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने केंद्रामध्ये सत्तेत असणाऱ्या मोदी सरकारला निर्देश दिल्यानंतरही त्याचं पालन होत नसल्याने बुधवारी उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. उच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान टाटा ग्रुप ऑफ कंपनीचा अनेकदा उल्लेख करत त्यांच्या कामाचं कौतुक केलं. टाटा कंपनी आपला सर्व ऑक्सिजन पुरवठा आरोग्य सुविधांसाठी देऊ शकते तर इतरांना काय अडचण आहे असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला.

दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती विपिन संघी आणि न्यायमूर्ती रेखा पाटील यांच्या खंडपीठासमोर मॅक्स हेल्थकेअरनं दाखल केलेल्या याचिकेची बुधवारी रात्री तातडीची सुनावणी घेण्यात आली. ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा होत असल्याची तक्रार मॅक्सनं आपल्या याचिकेमध्ये केली होती. संध्याकाळी ८ वाजता सुनावणी सुरू झाली, तेव्हा मॅक्सनं आपल्याकडे फक्त ३ तास पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक असून ४०० रुग्णांचा जीव धोक्यात आल्याचं कोर्टाला सांगितलं. या ४०० रुग्णांपैकी २६२ रुग्ण करोनाचे असल्याचं देखील कोर्टासमोर स्पष्ट करण्यात आलं.

“लोकांचे जीव सरकारसाठी महत्त्वाचे नाहीत का?”

दरम्यान, यावेळी उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला परखड शब्दांत जाब विचारला. “लोकांचे जीव सरकारसाठी एवढे महत्त्वाचे नाहीत का? ऑक्सिजनसारख्या महत्त्वाच्या बाबीकडे केंद्र सरकार करत असलेल्या दुर्लक्षामुळे आम्हाला धक्का बसला आहे. सरकारच्या प्रस्थापित स्त्रोतांमधून ऑक्सिजनची गरज भागत नसेल, तर ही सरकारची जबाबदारी आहे की त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्यासाठी दुसऱ्या मार्गांची सोय करावी”, असं कोर्टाने म्हटलं आहे.

नक्की वाचा >> देशासाठी कायपण… पुरवठा सुरळीत करण्यासाठी टाटा परदेशातून आणणार २४ मोठे ऑक्सिजन कंटेनर

…तर सर्व ऑक्सिजन वैद्यकीय पचारांसाठी वापरा

जर पर्याय नसेल, तर देशातील उद्योगधंद्यांचा ऑक्सिजन वैद्यकीय उपचारांसाठी वळवा, असे निर्देश यावेळी कोर्टाने केंद्र सरकारला दिले आहेत. “जर आवश्यक असेल, तर स्टील, पेट्रोलियम अशा उद्योगांकडून ऑक्सिजन उपचारांसाठी वळवा. या उद्योगांच्या प्लांटमधून ऑक्सिजन आवश्यक तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्व मार्गांचा विचार करा. त्यासाठी खास कॉरिडॉर देखील तयार करावा लागला तरी सरकारने ते करावं”, असं कोर्टानं याचिकेच्या सुनावणीवेळी नमूद केलं आहे. शक्य असेल तर हवाई मार्गाने देखील ऑक्सिजन वाहून नेता येईल, असं देखील कोर्टाने सांगितलं आहे.

उद्योगधंद्यांमधील ऑक्सिजनच्या वापरासंदर्भात बोलताना न्यायालयाने टाटा समुहाचा उल्लेख केला. “तुम्ही आता ४०० टन ऑक्सिजन पुरवत आहात तर त्यात समाधान व्यक्त करण्यासाठी काहीही नाहीय. केंद्र सरकारकडे ऑक्सिजन पुरवठा वैद्याकीय वापरासाठी वळवण्याचे सर्व अधिकार आणि स्त्रोत आहेत. टाटा सुद्धा ऑक्सिजनचा पुरवठा करतात. टाटा हे मदत करण्यासाठी तयार आहेत. सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने मदतासाठी पुढे येणं गरजेचं आहे. मग ते टाटा असोत किंवा इतर कुणी,” अशा शब्दांमध्ये न्यायालयाने एकीकडे टाटांचं कौतुक करतानाच दुसरीकडे ढिसाळ नियोजनासाठी केंद्र सरकारची खरडपट्टी काढली.


“तुम्ही आत्तापर्यंत केलं काय?”

ऑक्सिजनचा पुरवठा योग्य होण्यासाठी आत्तापर्यंत केंद्र सरकारने नेमकं केलं काय? असा सवाल देखील न्यायालयाने केला आहे. “सध्याचा ऑक्सिजनचा पुरवठा हा अजिबात पुरेसा नाही. मग तुम्ही यावर आत्तापर्यंत केलं काय? स्टील आणि पेट्रोलियम उद्योगांकडून ऑक्सिजन उपचारांसाठी वळवण आवश्यक आहे हे तुमच्या अधिकाऱ्यांना का नाही समजलं? हे करण्यात इतकी टाळाटाळ का केली जात आहे? स्टील प्लांट चालवणं इतकं महत्त्वाचं आहे का? टाटांना विचारा, ते मदत करतील. सरकारला वास्तवाचं भान का येत नाहीये? आपण लोकांना मरू देऊ शकत नाही”, असं दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2021 9:52 am

Web Title: delhi high court slams modi government and appreciate rata tata over oxygen supply issue scsg 91
Next Stories
1 Coronavirus: सीताराम येचुरी यांना पुत्रशोक
2 ‘प्राणवायू’वरून दिल्ली-हरियाणात वाक्युद्ध
3 काहीही करून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करा!
Just Now!
X