उन्नाव बलात्कार प्रकरणाची नवी दिल्लीतील एम्स (All India Institute of Medical Sciences) रुग्णालयातच सुनावणी घेण्यात येणार आहे. खटला सुरू करण्यासाठी पीडितेचा साक्ष नोंदवण्यासाठी रूग्णालयात सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाने ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय सुरू करण्यास परवानगी दिली. दरम्यान, आजपासून (११ सप्टेंबर) पीडितेचा जबाब नोंदवण्यासाठी जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर सुनावणी घेण्यात येणार आहे.

उन्नावमधील एका अल्पवयीन मुलीवर २०१७ मध्ये  बलात्कार करण्यात आला होता. भाजपातून हकालपट्टी करण्यात आलेल्या आमदार कुलदीप सेनगरने बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. याप्रकरणी सेनगरविरूद्ध गुन्हा दाखल झालेला आहे. दरम्यान, तक्रार मागे घेण्यासाठी सेनगर याच्याकडून धमक्या येत असल्याची माहिती पीडितेने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांना दिली होती. त्यानंतर सरन्यायाधीशांनी यांची गंभीर दखल घेत खटला लखनऊ येथून दिल्ली हलवला होता.

दरम्यान, आमदार सेनगरविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी पीडितेच्या कारला अपघात झाला होता. यात तरूणीच्या कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यू झाला होता. तर पीडितेसह तिचे वकील गंभीर जखमी झाले होते. हा अपघात नसून, हल्ला असल्याचा आरोप पीडितेच्या नातेवाईकांनी केला होता. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पीडितेची प्रकृती खालावल्याने तिला नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते.

पीडितेला दिल्लीत हलवल्यानंतर आणि सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. पीडितेवर अजूनही ‘एम्स’मधील ट्रामा सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. त्यामुळे पीडितेची साक्ष झालेली नाही. “पीडितेला स्ट्रेचरवरून न्यायालयात आणणे धोकादायक ठरू शकते. तसेच तिची ओळख सार्वजनिक होऊन वैयक्तिक आयुष्यही धोक्यात येऊ शकते”, असे मत नोंदवत न्यायालयाने एम्स ट्रामा सेंटरमध्ये तात्पुरते न्यायालय उभारण्यास परवानगी देऊन तसे निर्देश दिले होते. “रूग्णालयात सुनावणी झाल्यामुळे पीडिता कोणतीही भीती न बाळगता साक्ष देईल”, असे मतही न्यायालयाने नोंदवले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर आजपासून (११ सप्टेंबर) जिल्हा न्यायाधीश धर्मेश शर्मा यांच्यासमोर रुग्णालयातच सुनावणी होणार असून पीडितेची साक्ष नोंदवण्यात येणार आहे.