दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित हे दहशतवादी मॉड्यूल भारतात चालवत होते. दरम्यान, त्या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासलं जात आहे. पोलीस उपायुक्त, प्रमोद कुशवाह यांनी ही माहिती दिली.

दिल्लीत पाकिस्तानचे मोठे षडयंत्र उघड करत स्पेशल सेलने ६ जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलसाठी काम करणाऱ्या ६ पैकी २ जणांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे छापे टाकले आणि एकूण ६ जणांना अटक केली. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य दोन पाकिस्तानींच्या सांगण्यावरून काम करत होते. त्यांचा हेतू नवरात्र आणि इतर सणादरम्यान हल्ला करणे होता. त्यांच्याकडून आईईडी देखील जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांचे वय २२ ते ४३ वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे.

पोलीस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की, “या दहशतवादी मॉड्यूलचे कनेक्शन डी कंपनीकडून सांगितले जात आहे. हे दहशतवादी मॉड्यूल आयएसआयच्या संरक्षणाखाली एक मोठा कट रचत होते. अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी २ पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन परत आले आहेत. दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाचे हे बहुराज्यीय ऑपरेशन होते.”

“दहशतवाद्यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. एक टीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने सांभाळत होता. ज्या टीमला सीमेपलीकडून शस्त्रे भारतात आणणे आणि येथे लपवण्याचे काम देण्यात आले होते. दुसऱ्या टीमला हवालाद्वारे पैशांची व्यवस्था करावी लागत होती.” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून चौघांना अटक करण्यात आली आहे. मोहम्मद ओसामा असे एका दहशतवाद्याचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी असल्याचे सांगितले जाते. इतरांची नावे  जीशान कमर, जान मोहम्मद अली शेख, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला, अशी सांगितली जात आहेत.