दिल्ली उच्च न्यायालयाची तुसीद, विद्यापीठ यांना नोटीस

दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी निवडून आलेला एनएसयूआयचा उमेदवार रॉकी तुसीद याचा गुन्हेगारी स्वरूपाचा रेकॉर्ड असल्याची बाब उघड झाली असून, हा रेकॉर्ड कथितरीत्या लपवण्यात आल्याची बाब ‘अत्यंत गंभीर’ असल्याचे मत दिल्ली उच्च न्यायालयाने व्यक्त केले.

अभाविपचा उमेदवार रजत चौधरी याचा पराभव करून रॉकी तुसीद नुकताच अध्यक्ष म्हणून निवडून आला होता. त्याच्याविरुद्ध गुन्हे दाखल असल्याची बाब त्याने अधिकाऱ्यांपासून लपवून ठेवल्याची माहिती बुधवारी न्यायालयाला देण्यात आली. त्यावर, हे अत्यंत गंभीर आहे. ही लपवालपवी आहे, असे न्या. इंदरमित कौर यांनी चौधरी याच्या ‘इम्प्लीडमेंट अ‍ॅप्लिकेशन’वर तुसीद व दिल्ली विद्यापीठाला नोटीस जारी करताना सांगितले.

रॉकी तुसीद याच्याविरुद्ध करण्यात आलेल्या शिस्तभंगाच्या कारवाईच्या आधारे या निवडणुकीसाठी त्याची उमेदवारी दिल्ली विद्यापीठ निवडणूक आयोगाने रद्द ठरवली होती. या आदेशाला आव्हान देणारी तुसीद याने केलेली याचिका प्रलंबित आहे. या याचिकेतच रजत चौधरी याने हा अर्ज केला आहे.

लिंगडोह समितीने केलेल्या शिफारशीनुसार, उमेदवाराचा गुन्हेगारी पूर्वेतिहास नसावा, त्याला कुठल्याही फौजदारी गुन्ह्य़ात शिक्षा झालेली नसावी आणि विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केलेली नसावी. मात्र, तुसीद याच्याविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह इतर गुन्ह्य़ांमध्ये २०१४ साली गुन्हा दाखल झाला होता व आरोपपत्रही दाखल करण्यात आले होते ही बाब त्याने उघड केली नाही, असे चौधरी याने या अर्जात म्हटले आहे.