दिल्लीत खंडणीसाठी सात वर्षांच्या मुलाची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हत्या करणारा तरुण हा मुलाच्या शेजारीच राहायचा. मुलाची हत्या केल्यानंतर त्याने ३५ दिवस मुलाचा मृतदेह घरातील सुटकेसमध्येच ठेवला होता. घरातून दुर्गंधी आल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला आणि आरोपीची रवानगी तुरुंगात झाली.

दिल्लीतील स्वरुप नगर येथे राहणाऱ्या आशिष सिंह या सात वर्षांच्या मुलाचे ७ जानेवारी रोजी अपहरण झाले होते. गेले महिनाभर पोलीस आशिषचा शोध घेत होते. अखेरीस आशिषची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला अवदेश शक्य (२७) हा दिल्लीत यूपीएससीच्या तयारीसाठी आला होता. तीन वर्षांपूर्वी तो स्वरुप नगरमध्ये करण सिंह यांच्या खोलीत भाड्याने राहायला आला. आशिष हा करण यांचा मुलगा होता. सुरुवातीला सिंह कुटुंब आणि अवदेश यांच्यात चांगले संबंध होते.

काही महिन्यांपूर्वी अवदेश त्याच परिसरातील दुसऱ्या खोलीत राहायला गेला. त्यानंतरही अवदेश हा सिंह यांच्या घरी यायचा. करण यांनी अवदेशला मुलाला भेटू नकोस असे बजावले होते. यावरुन दोघांमध्ये वादही झाला होता. या वादाचा बदला घेण्यासाठी त्याने आशिषचे अपहरण करण्याचा कट रचला. त्याने ७ जानेवारी रोजी आशिषला नवीन सायकल घेऊन देतो, असे सांगत स्वत:च्या घरी नेले. आई- वडिलांनी माझ्याविषयी काय काय सांगितले असे त्याने आशिषला विचारले. बाबांनी तुझ्यासोबत जाऊ नको असे सांगितल्याची कबुली आशिषनने दिली. यामुळे अवदेश संतापला आणि त्याने मफलरने गळा आवळून आशिषची हत्या केली. सिंह कुटुंबाकडून १५- २० लाख रुपयांची खंडणी मागण्याचा त्याचा कट होता. त्याने आशिषचा मृतदेह घरातील एका सुटकेसमध्ये टाकला.

दुसरीकडे आशिषचे आई- वडील मुलाचा शोध घेत होते. अवदेशने यात सक्रीय सहभाग घेतला. तो बऱ्याचदा त्यांच्यासोबत पोलीस ठाण्यातही गेला. मृतदेह बाहेर फेकण्याचा त्याचा डाव होता. मात्र, परिसरात पोलिसांची करडी नजर होती आणि अवदेशला सुटकेस घराबाहेर नेणे शक्य झाले नाही. काही दिवसांनी घरातून दुर्गंधी यायला सुरुवात झाली. शेजारच्यांनी अवदेशकडे विचारणाही केली. मात्र, अवदेशने घरात उंदीर मेल्याचे सांगितले होते. शेवटी याची माहिती पोलिसांना समजली आणि त्यांनी अवदेशला चौकशीसाठी ताब्यात घेतले. अवदेशने गुन्ह्याची कबुली दिली असून खंडणीचा कट होता. मात्र भितीपोटी मी खंडणी मागितली नाही, असे त्याने सांगितले.