23 April 2019

News Flash

दहशतवाद्यांविरुद्ध लढणार महिला SWAT कमांडो, दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी

पुरुषांच्या बरोबरीने आता महिला कमांडो दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी संभाळणार आहेत. दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे.

सौजन्य - टाइम्स ऑफ इंडिया

पुरुषांच्या बरोबरीने आता महिला कमांडो दिल्लीच्या संरक्षणाची जबाबदारी संभाळणार आहेत. दिल्लीच्या सुरक्षेसाठी स्वॅट महिला कमांडो पथक तयार करण्यात आले आहे. स्वॅट महिला कमांडो पथक असलेले दिल्ली हे देशातील पहिले पोलीस दल ठरणार आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत शुक्रवारी स्वॅट महिला कमांडोंचा दिल्ली पोलीस दलात अधिकृत समावेश करण्यात येईल. ईशान्य भारतातील ३६ महिलांचा या कमांडो युनिटमध्ये समावेश करण्यात आला आहे.

भारतीय आणि परदेशी तज्ञांच्या देखरेखीखाली या ३६ महिलांना अत्यंत कठोर, खडतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. पुरुषांप्रमाणे महिलांचे अशा पद्धतीचे विशेष कमांडो युनिट उभारण्याची मूळ कल्पना दिल्लीचे पोलीस आयुक्त अमुल्य पटनायक यांची आहे. दिल्लीतील दहशतवादी करावाया रोखण्याची मुख्य जबाबदारी या पथकावर असेल. पुरुषांच्या तुलनेत या महिला सरस असल्याचे त्यांच्या प्रशिक्षणकर्त्यांनी सांगितल्याचे पटनायक म्हणाले.

अनेक प्रगत पाश्चिमात्य देशांनी अजून महिलांचे स्वॅट कमांडो पथक उभारलेले नाही. त्यामुळे ही मोठी बाब आहे. या ३६ महिला कमांडोंमध्ये आसाममधील १३, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि मणिपूरमधल्या प्रत्येकी पाच महिलांचा समावेश आहे. भारताप्रमाणेच इस्त्रायलमध्येही या महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. विनाशस्त्र कसे लढायचे ते सुद्धा या महिलांना शिकवण्यात आले आहे.

MP5 सबमशिन गन आणि ग्लॉक २१ पिस्तुलने या महिला कमांडो सुसज्ज असतील. मध्य आणि दक्षिण दिल्लीतील महत्वाच्या स्थळांवर या महिला कमांडोंची तैनाती करण्यात येईल. नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले असेल तर त्यांची कशी सुटका करायची, इमारतींचे मजले कसे चढून जाण्याचे त्याचे या महिला कमांडोंना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

First Published on August 10, 2018 1:56 pm

Web Title: delhi women swat commando unit
टॅग Delhi