दिल्ली येथे ‘सुलभ इंटरनॅशनल’ या संस्थेने उभारलेल्या प्रसाधनगृहांची माहिती देणाऱ्या आंतरराष्ट्रीय संग्रहालयास ‘टाइम’ मासिकाने जाहीर केलेल्या यादीत तिसरा क्रमांक मिळाला आहे. दिल्लीच्या या संग्रहालयात देशात ४५०० वर्षांत प्रसाधनगृहांची संख्या कशी वाढत गेली तसेच इतर माहिती दिली आहे.  
या स्पर्धेचा निकाल बुधवारी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत ‘रेकजाविर’ या आइसलंडमधील फॅलोलॉजिकल संग्रहालयास पहिला पुरस्कार मिळाला असून मॅसॅच्युसेटस येथील म्युझियम ऑफ बार्ड आर्टला दुसरा पुरस्कार मिळाला आहे. त्यानंतर सुलभ इंटरनॅशनलच्या टॉयलेट म्हणजे प्रसाधनगृह संग्रहालयाचा क्रमांक तिसरा लागला आहे.
देशातील प्रसाधनगृहांचा इतिहास जाणून घेण्याच्या इच्छेतून हे संग्रहालय उभे राहिले असून ते पाहण्यासारखे आहे. साध्या चेंबर पॉटपासून सुशोभित व्हिक्टोरियन टॉयलेट व त्यानंतरचा प्रवास यात दिसून येतो, असे टाइमने म्हटले आहे. क्रोशियातील झाग्रेबचे द म्युझियम ऑफ ब्रोकन रिलेशनशिप, जपानमधील ओसाकाचे मोमोफुकू अँडो इन्स्टंट रामेन म्युझियम, पोर्टलँडमधील माइने येथे असलेले इंटरनॅशनल क्रिप्टॉझूलॉजी म्युझियम,टोकियोतील मेगुरो पॅरासिटोलॉजिकल म्युझियम, नेदरलँडसच्या अ‍ॅमस्टरडॅम येथील मीडिव्हल टॉर्चर इन्स्ट्रमेंट म्युझियम( मध्ययुगीन काळातील छळ करण्याची हत्यारे)अमेरिकेत कान्सास येथील ला क्रॉसी येथील कन्सास बार्बड वायर म्युझियम यांचा या यादीत समावेश आहे.