केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सध्याच्या ७२ टक्क्य़ांवरून ८० टक्के करण्याच्या प्रस्तावाला उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ५० लाख कर्मचारी व ३० लाख निवृत्तिवेतनधारक यांना त्याचा लाभ मिळणार आहे. सूत्रांनी सांगितले की, महागाई भत्ता ८ टक्क्य़ांनी वाढवण्याचा अर्थमंत्रालयाचा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळापुढे असून तो उद्याच्या बैठकीत मान्य होण्याची शक्यता आहे.ही वाढ १ जानेवारी २०१३ पासून लागू  राहणार आहे. कर्मचाऱ्यांना थकबाकीही दिली जाण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये महागाई भत्ता ७२ टक्के करण्यात आला होता. महागाई भत्ता मूळ वेतनात समाविष्ट करून सातवा वेतन आयोग स्थापन करावा, अशी मागणी केंद्रीय कर्मचारी संघटनेचे सचिव के.के.एन. कुट्टी यांनी केली.