प्रतिनिधिगृह अध्यक्ष नॅन्सी पलोसी यांचा इशारा; राजीनाम्याची मागणी

वॉशिंग्टन : अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तातडीने राजीनामा न दिल्यास त्यांच्याविरोधात महाभियोग दाखल करण्याचा इशारा प्रतिनिधिगृहाच्या अध्यक्षा नॅन्सी पलोसी यांनी दिला आहे. ट्रम्प यांनी कॅपिटॉल हिल येथे त्यांच्या समर्थकांना हल्ले करण्यास फूस दिली होती, त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, असे पलोसी यांचे मत आहे.

ट्रम्प यांनी राजीनामा द्यावा अशी प्रतिनिधींची इच्छा आहे. पण जर त्यांनी राजीनामा दिला नाही, तर आपण नियम समितीला २५व्या घटनादुरुस्तीचा कायदा लागू करून त्यांच्या विरोधात महाभियोगाचा प्रस्ताव दाखल करू. २५वी घटनादुरु स्ती किंवा इतरही अनेक मार्ग ट्रम्प यांना पदावरून हटवण्यासाठी उपलब्ध आहेत, असे पलोसी यांनी सांगितले. त्यांनी या मुद्दय़ावर डेमोकॅट्रिक सदस्यांशी तासभर चर्चा केली.

महाभियोगाचे दोन प्रस्ताव मांडण्यात आले असून, डेव्हिड सिसीलाईन व टेड लिऊ, तसेच जेमी रस्कीन यांनी महाभियोगाच्या काही तरतुदी ट्रम्प यांना लागू करण्याचे मत व्यक्त केले आहे. यात अमेरिकेत हिंसाचार पसरवणे व जॉर्जियाच्या पदाधिकाऱ्यांवर फेरमतमोजणीसाठी किंवा निकाल बदलण्यासाठी दबाव आणणे या दोन्ही प्रकरणात ट्रम्प यांना जबाबदार ठरवण्याचे उद्देश साध्य होणार आहेत.

दरम्यान, कॅपिटॉल हिलमध्ये हिंसाचार पसरवण्याप्रकरणी ट्रम्प यांच्यावर महाभियोग दाखल करण्याचे आवाहन काँग्रेसच्या परराष्ट्र  समितीचे अध्यक्ष ग्रेगरी मिक्स यांनी केले आहे. त्याबाबत त्यांनी पलोसी यांना पत्र पाठवले आहे.

ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद

’ कॅपिटॉल हिल येथे करण्यात आलेल्या हल्ल्यासारखा हिंसाचार पुन्हा घडू नये यासाठी अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद करण्यात आले आहे.

’ ट्रम्प यांनी अलीकडे ‘अ‍ॅट रिअल डोनाल्ड ट्रम्प’ या हॅशटॅगवर जे ट्वीट संदेश टाकले आहेत त्याचा गर्भितार्थ लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली. ट्विटरने म्हटले आहे, की ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद करण्यात आले आहे. त्यांचे ८८.७ दशलक्ष अनुसारक असून ते ५१ जणांचे अनुसारक होते.

’ बुधवारी झालेल्या भयानक घटनांच्यावेळीही ट्रम्प यांनी ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केले होते व आता पुन्हा हिंसाचाराची भीती असल्याने त्यांचे ट्विटर खाते बंद करण्यात येत आहे. हा निर्णय लोकहिताच्या दृष्टीने घेण्यात आला आहे, असे ट्विटरने म्हटले आहे.

ट्विटरप्रमाणे समांतर यंत्रणा सुरू करण्याचे संकेत

’ अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर खाते कायमचे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यावर स्वत: ट्रम्प यांनी जोरदार टीका केली आहे. आपण आणि आपल्या समर्थकांचा आवाज दडपून टाकता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

’ असे घडणार असल्याचे भाकीत आपण केले होते, आम्ही अन्य समाजमाध्यमांशी चर्चा करीत असून लवकरच मोठी घोषणा करणार आहोत, इतकेच नव्हे तर नजीकच्या भविष्यात आपण स्वत:चे व्यासपीठही स्थापन करण्याबाबतची शक्यता पडताळणार आहोत, आम्ही गप्प बसणार नाही, असे ट्रम्प यांनी स्पष्ट करून ट्विटरप्रमाणे समांतर यंत्रणा चालविण्याचे संकेत दिले.