Demonetisation नोटाबंदीवरुन मोदी सरकारवर विरोधकांनी टीका केली असतानाच सरकारने नोटाबंदीच्या निर्णयामुळे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर लगाम लावण्यात यश आल्याचा दावा केला आहे. नोटाबंदीनंतर लोकसंख्येपैकी ०.०००११ % लोकांनी देशातील उपलब्ध एकूण रकमेच्या ३३ टक्के रक्कम जमा केल्याचे सरकारने म्हटले आहे. हा आकडा ५ लाख कोटींच्या घरात असल्याचा दावा सरकारने केला.

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त केंद्र सरकारने सर्व वृत्तपत्रांमध्ये जाहिराती दिल्या असून यात नोटाबंदीमुळे झालेले फायदे सांगण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला असून सात मिनिटांच्या व्हिडिओतही नोटाबंदीमुळे सरकारने नेमके काय साधले याची मुद्देसूद माहिती देण्यात आली आहे.

नोटाबंदीनंतर देशाच्या इतिहासात सर्वाधिक काळ्या पैशांचा शोध लागल्याचा दावा सरकारने केला आहे. १७. ७३ लाख संशयित प्रकरणे उघडकीस आली असून २३.२२ लाख खात्यांमध्ये अंदाजे ३. ६८ लाख कोटी रुपयांची संशयित रोकड जमा करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे. दहशतवाद आणि नक्षलवादावरही लगाम लावण्यात यश आले असून काश्मीरमधील दगडफेकीच्या घटनांमध्ये ७५ टक्के घट झाली. तर ७.६२ लाखांचे बनावट चलन सापडले. याशिवाय बोगस कंपन्यांना काळा पैसाही समोर आला आहे. २. २४ लाख बोगस कंपन्या बंद केल्याचे सरकारने सांगितले.

नोटाबंदीमुळे करदात्यांच्या संख्येतही २६. ६ टक्क्यांनी वाढ झाली असून २०१५-१६ मध्ये ६६.५३ लाख करदाते होते, तर २०१६ -१७ हेच प्रमाण ८४.२१ लाखांवर पोहोचले. याशिवाय डिजिटल व्यवहारांमध्येही ५८ टक्क्यांनी वाढ झाल्याचा दावा सरकारने केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरुन जनतेचे आभारही मानले आहेत. भ्रष्टाचार आणि काळ्या पैश्यांविरोधातील लढाईत सहकार्य करणाऱ्या सर्वसामान्यांचे आभार, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे.