संयुक्त राष्ट्रांची युवा हवामान परिषद सुरू होत असून त्यानिमित्ताने हवामान बदलावर उपाययोजना करण्याच्या मागणीसाठी येथे मोठय़ा प्रमाणात निदर्शने करण्यात आली. जगभरात ही निदर्शने झाली असून त्यात शाळकरी व महाविद्यालयीन मुलांनी सहभाग घेतला.‘ ही केवळ सुरुवात आहे’,  असे स्वीडनची युवा हवामान कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग हिने म्हटले आहे, ती युवा परिषदेत सहभागी होत आहे.

जगभरात हवामान बदलाच्या मुद्दय़ावर ४० लाख लोक रस्त्यावर आले होते असे  सांगण्यात आले. हवामान बदल व वाढत्या तापमानाच्या मुद्दय़ावर इतक्या मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊन लोक रस्त्यावर उतरण्याची ही पहिलीच वेळ होती. युवक-युवतींनी आशिया, पॅसिफिक, आफ्रिका, लॅटिन अमेरिकेतील देशांत मोठय़ा प्रमाणात निदर्शनात सहभाग घेतला. न्यूयॉर्क येथील हवामान बदलांविरोधातील निदर्शनात थनबर्ग ही सहभागी झाली होती. ‘हवामान बदलांबाबत  जनजागृती होत आहे’, असे सांगून थनबर्ग हिने या सगळ्या निदर्शनांबाबत शंका व्यक्त करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले. न्यूयॉर्क येथे अडीच लाख लोक हवामान बदलविरोधी आंदोलनात सहभागी झाले होते असे तिने  म्हटले आहे. ३५० डॉट ओआरजी  या संस्थेने या निदर्शनांचे आयोजन केले  होते, त्यात १६८ देशात ५८०० निदर्शने करण्यात आली. बर्लिन, बोस्टन,कंपाला, किरीबाती, सोल, साव पावलो अशा अनेक ठिकाणी आंदोलन झाले त्यात ‘देअर इज नो प्लॅनेट बी, मेक द अर्थ ग्रेट अगेन’ अशा घोषणा देण्यात आल्या. न्यूयॉर्क येथील बॅटरी पार्क येथे हजारो आंदोलकांनी थनबर्ग हिचे  स्वागत केले. ‘जगातील नेत्यांनी हवामान बदलांवर आताच कृती करावी, नंतर वेळ निघून गेलेली असेल’,  असा आग्रह तिने यावेळी धरला. ‘आमचे भविष्यच आमच्यापासून हिरावून घेतले जात असताना आम्ही भविष्याचा अभ्यास कशाला करायचा’,  असे सांगून ती म्हणाली की, आम्हाला सुरक्षित भविष्यकाळ हवा आहे. हे आमचे मागणे फार मोठे आहे असे मला वाटत नाही.

भारत महत्त्वाचा भागीदार-गट्रेस

संयुक्त राष्ट्रे : हवामान बदलाविरोधातील प्रयत्नात भारत हा महत्त्वाचा भागीदार असून अक्षय ऊर्जा क्षेत्रात  या देशाने चांगले प्रयत्न केले आहेत, अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँतोनियो गट्रेस यांनी भारताची प्रशंसा केली आहे. ते म्हणाले की, आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी तयार करून हवामान बदलाच्या क्षेत्रात मोठे काम केले.सौरऊर्जा क्षेत्रात भारतामध्ये मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. असे असले तरी अजून भारतात कोळशावरचे अवलंबित्व कमी झालेले नाही. त्यांच्या इतर योजनातूनही त्यांनी हवामान बदलांच्या समस्येवर मोठे काम केले आहे.