बहिणीच्या लग्नाला सुट्टी नाकारली म्हणून हरयाणा रोहतकमधील पीजीआयएमएस कॉलेजमधून एमडी करणाऱ्या एका ३० वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ओंकार असे मृत डॉक्टरचे नाव असून तो मूळचा कर्नाटक धारवाडचा आहे. गुरुवारी रात्री वसतिगृहाच्या रुममध्ये गळफास घेऊन त्याने जीवन संपवले. ओंकार बालरोग विषयात एमडी करत होता.

विभागीय प्रमुखाच्या छळाला कंटाळून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती रोहतक पोलीस स्टेशनचे एसएचओ कैलाश चंदर यांनी दिली. ओंकारने कुठलीही चिठ्ठी मागे सोडलेली नाही. विभागाच्या प्रमुखाकडून त्याचा छळ सुरु होता असा आरोप कुटुंबिय आणि सहकाऱ्यांनी केला आहे. ओँकारला बहिणीच्या लग्नासाठी सुट्टी हवी होती. पण त्याला सुट्टी नाकारण्यात आली होती.

त्यामुळे त्याने आत्महत्येचे टोकाचे पाऊल उचलले असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी महिला डॉक्टरविरोधात कलम ३०६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजून कोणालाही अटक केलेली नाही. चौकशी सुरु आहे असे पोलिसांनी सांगितले. गुरुवारी रात्री ११ वाजता ओंकारने आत्महत्या केल्यानंतर अन्य सहकारी डॉक्टरांनी आंदोलन केले व आरोपी डॉक्टरला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.