गव्हाच्या काढणीचा हंगाम संपला असल्याने भारतात वर्षभर तरी ‘व्हीट ब्लास्ट’ या रोगाची लागण होण्याची चिंता नाही. तसेच हा रोग येऊ नये म्हणून विशेष दक्षता घेतली जात आहे. बांगलादेशातील बियाणे आपल्याकडे वापरले जात नसल्याने हा रोग पडण्याची शक्यता कृषि वैज्ञानिकांनी फेटाळून लावली आहे. असे असले तरी हा रोग भारतातील गहू पिकावर पडू नये यासाठी आधीच दक्षता घेण्यात आली आहे, या रोगास प्रतिकारक्षम असलेल्या गव्हाच्या प्रजाती तयार करण्याचे काम भारतात चालू असून लवकरच त्या उपलब्ध होणार आहेत त्यामुळे या रोगाच्या अफवांमुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नाही असे आवाहन करण्यात आले. बांगलादेशला शेजारी राज्य असलेल्या पश्चिम बंगालमध्ये गहू पीक घेतले जात नाही त्यामुळे आपल्याकडे हा रोग येण्याची शक्यता नाही.
कर्नाल येथील राष्ट्रीय गहू संशोधन केंद्रातील प्रमुख पीक रोग वैज्ञानिक डॉ.सहारन यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले की,या रोगाचा प्रादुर्भाव बियाणातून व हवेतून होतो. आपल्या देशातील शेतकरी बांगलादेशातील गव्हाचे बियाणे वापरत नाही. तसेच, आता या रोगाला प्रतिकारक गव्हाच्या प्रजाती तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरू होईल. त्या पूर्वीच हा रोग येऊ नये म्हणून वर्षभर अगोदर उपाययोजना केली जात आहे. बांगलादेशाने रोग निवारणासाठी यंदा उपाययोजना केली होती, या रोगाच्या जीवाणूंचा प्रसार रोखण्यासाठी रोगग्रस्त पीक जाळून टाकण्यात आले. भारत या संबंधी बांगलादेशाशी चर्चा करत आहे. हा रोग देशात येण्याची शक्यता नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रात पाण्याच्या उपलब्धतेनुसार पाच ते नऊ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाचे पीक घेतले जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अन्य संशोधन संस्थांनी तांबेरा प्रतिकारक प्रजाती शोधल्या आहेत. राज्यातील हवामान या रोगाला अनुकूल नाही. तसेच यापूर्वी युगांडा व केनियामध्ये गव्हावर युजी ९९ हा रोग आला होता. कृषि अनुसंधान परिषदेने प्रयत्न करून तो देशात येऊ दिला नाही, असे कृषिशास्त्रज्ञ व धुळे येथील कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रमोद रसाळ यांनी सांगितले. निफाड येथील गहू संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.अरिवद पाध्ये म्हणाले, की व्हीट ब्लास्ट हा रोग राज्यात आढळून आलेला नाही. राज्यात पूर्वी नारंगी तांबेरा येत होता, पण त्याला प्रतिकारक प्रजाती शोधल्या आहेत. या प्रजातीचे बियाणे शेतकरी वापरतात असे ते म्हणाले. बांगलादेशात एकाच जमिनीत भाताची अनेक पिके घेतली जातात. भाताची काढणी झाल्यानंतर लाकडी नांगराने त्यातच गहूपेरणी केली जाते. पीक लागवड सदोष असल्याने रोग प्रसार होतो. आपल्याकडे पिकावर पिके घेतली जात नाहीत. भात काढून शेतकरी गहू घेत नाही, आपली पीक पद्धती भिन्न आहे. त्यामुळे या रोगाचा प्रसार शक्य नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
तामिळनाडूतील निलगिरीपर्वत भागातून तांबेरा आपल्याकडे येत होता, त्याचा बीमोड करण्यात कृ षी विद्यापीठांना यश आले. हा रोग येऊ नये म्हणून कृषि संशोधन परिषदेच्या सूचनेप्रमाणे उपाययोजना केली जाईल, असे डॉ. पाध्ये यांनी सांगितले.

व्हीट ब्लास्टची लक्षणे व इतिहास
१९८५ साली ब्राझीलमधील गव्हाच्या पिकावर व्हीट ब्लास्ट हा रोग सर्वात प्रथम आढळून आला. त्या नंतर आशिया खंडात प्रथमच बांगलादेशात चालू वर्षी या रोगाचा प्रादुर्भाव झाला असून पंधरा हजार हेक्टर क्षेत्रातील गव्हाचे पीक जाळून टाकावे लागले आहे. या रोगात गव्हाच्या पानावर डोळयाच्या आकाराचे चॉकलेटी डाग पडतात.ओंबी पांढरी होते.उत्पादनात पंचाहत्तर टक्के घट येते. जगात सध्या गव्हावरील खतरनाक असा हा रोग मानला जातो. हा रोग भारतात येऊ नये म्हणून आतापासूनच उपाय योजना सुरू करण्यात आली आहे. देशात गहू पिकाचे उत्पादन नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होते.