अवघ्या तीन आठवडय़ांपूर्वीच दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारणारे आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी केंद्र सरकारविरोधात जनआंदोलन छेडले. केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या घरावर मोर्चा नेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला. मात्र, न्याय मिळेपर्यंत आंदोलन चालूच राहील असा निर्धार करत केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी येथील रेल भवन परिसरात बसकण मारली. दिल्लीच्या राजकीय इतिहासात प्रथमच मुख्यमंत्र्याने केंद्र सरकारविरोधात आंदोलन छेडले आहे.
केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील कायदामंत्री सोमनाथ भारती यांनी गेल्या बुधवारी त्यांच्या मालवीय नगर मतदारसंघातील वेश्याव्यवसायाविरोधात कारवाई करण्याची मागणी दिल्ली पोलिसांकडे केली होती. मात्र, पोलिसांनी त्यांची मागणी धुडकावून लावली. त्यावर दिल्ली सरकारने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे दाद मागितली. परंतु तरीही कारवाई झाली नाही. या पाश्र्वभूमीवर केजरीवाल यांनी सोमवारी त्यांच्या निवासस्थानी आपल्या सर्व आमदारांचा मोर्चा नेण्याचे ठरवले. मात्र, पोलिसांच्या कारवाईमुळे त्यांना रेल भवन येथेच रोखण्यात आले. केजरीवाल यांनी न्याय मिळेपर्यंत येथेच ठाण मांडून बसण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. दरम्यान, केजरीवाल यांच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर दिल्ली पोलिसांच्या सुटय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र, केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस दलातील प्रामाणिक पोलीस व अधिकाऱ्यांनी सुट्टी घेऊन आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले.  
भाजप कार्यकर्त्यांनी केजरीवाल व त्यांचे सहकारी भारतीय राज्यघटनेचा अवमान करीत असल्याचा आरोप केली. आंदोलनामुळे हजारो विद्यार्थी, नोकरदार, महिलांची गैरसोय झाली.
माझ्यावर ‘अराजक माजवणारा’ असा आरोप होत आहे. होय, मी आहे तसा. मात्र, ते लोकहितासाठी आहे. दिल्ली पोलिसांची अरेरावी वाढली आहे. त्याविरोधात आंदोलन करणे भाग आहे. यातून प्रजासत्ताकदिनाच्या पाश्र्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास केंद्र सरकारच जबाबदार असेल.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री