भाजपची देशव्यापी जनजागृती मोहीम; ५ -२० जानेवारीदरम्यान आक्रमक प्रचार

नवी दिल्ली : नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिकत्व नोंदणी या दोन्ही मुद्दय़ांबाबत लोकांचा विरोधी दृष्टिकोन बदलण्यासाठी भाजपने देशव्यापी जनजागृती मोहीम हाती घेतली असून ती ५ ते २० जानेवारी या पंधरा दिवसांमध्ये राबवली जाणार असून ३ कोटी कुटुंबांशी संवाद साधला जाणार आहे.

राष्ट्रीय स्तरावर या मोहिमेची सुरुवात ५ जानेवारी रोजी पक्षाध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्यासह देशातील भाजपचे प्रमुख ५० नेत्यांच्या हस्ते होणार आहे. नड्डा यांच्या उपस्थितीत गुरुवारी मोहिमेची सविस्तर आखणी करण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागरिकत्व नोंदणी देशव्यापी नसेल अशी ग्वाही देऊनसुद्धा नागरिकत्व दुरुस्ती आणि नागरिक नोंदणी विरोधातील जनआंदोलन कमी झालेले नाही. त्यामुळे लोकांचा दृष्टिकोन बदलायचा कसा, असा प्रश्न भाजपसमोर निर्माण झाला असल्यामुळे तातडीने पक्षाची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली.

या बैठकीत संघटना महासचिव बी. एल. संतोष, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, मुख्तार अब्बास नक्वी, किरण रिजीजू, अर्जुनराम मेघवाल, गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह लडाखचे खासदार जमयांग नामग्याल, राज्यसभेचे खासदार राजीव चंद्रशेखर, प्रवक्ता नरसिंह राव आदी उपस्थित होते. या बैठकीत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश होता. या बैठकीनंतर जनजागृती मोहिमेच्या कार्यक्रमाच्या माहितीचे मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांचे पत्र सर्व प्रदेशाध्यक्ष, प्रदेश प्रभारी, संघटना मंत्री यांना पाठवण्यात आले आहे.

कार्यक्रम काय असेल?

*  तब्बल ३ कोटी कुटुंबांच्या घरात जाऊन कायद्याबाबत तथ्य समजावणे.

*  कायदा केल्याबाबत पंतप्रधान मोदी यांना किमान १ कोटी धन्यवाद पत्र (पोस्ट कार्ड, मोदी अप, ई-मेल यांचाही समावेश) पाठवणे. प्रत्येक प्रदेश भाजपकडून लक्ष्य ठरवले जाईल.

*  या मोहिमेसाठी १० लाख भाजप कार्यकर्त्यांना कामाला लावले जाईल. प्रत्येक भाजपने कार्यकर्त्यांची संख्या निश्चित करणे.

*  या मोहिमेसाठी संघ परिवारातील कार्यकर्त्यांचा अधिकाधिक वापर केला जाईल.

*  कार्यकर्त्यांसाठी कार्यशाळा घेतली जाईल. त्यात खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख, विभागप्रमुख यांचाही समावेश असेल.

*  प्रदेश स्तरावर भाजपचे मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष व प्रमुख नेता मोहिमेचे उद्घाटन करतील.

सहा सदस्यांची केंद्रीय समिती

संपूर्ण मोहिमेवर देखरेख ठेवण्यासाठी सहा सदस्यांची केंद्रीय समिती नेमण्यात आली आहे. डॉ. अनिल जैन, अविनाश राय खन्ना, सरोज पांडे, रवींद्र राजू, राहुल सिन्हा आणि सुरेश भट्ट ( हरियाण, पंजाब, हिमाचल, चंदिगढ, जम्मू-काश्मीर) यांच्याकडे मोहिमेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.