मागील काही वर्षांपासून दिवाळीच्या काळात आवर्जून बातम्यांमध्ये असणारे नाव म्हणजे गुजरातमधील हिरे व्यावसायिक सावजी ढोलकीया. दर वर्षी आपल्या कर्मचाऱ्यांना महागड्या वस्तू बोनस म्हणून देणारे ढोलकीया यांनी यावर्षी हात आखडता घेण्याचा निर्णय घेतला आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांना गाड्या आणि घरे बोनस म्हणून देणाऱ्या ढोलकीया यांच्या उद्योगाला मंदीचा फटका बसला आहे. त्यामुळेच या दिवळीमध्ये कर्मचाऱ्यांना महागडा बोनस न देण्याचा निर्णय घेतला आहे.

आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीचा बोनस म्हणून फ्लॅट्स आणि गाड्या भेट देणारे ढोलकिया देशभरात चर्चेचा विषय ठरले होते. त्यांनी २०१८ मध्ये आपल्या कंपनीमधील ६०० कर्मचाऱ्यांना चारचाकी गाड्या भेट म्हणून दिल्या होत्या. तर कामगिरीच्या आधारावर त्यांनी इतर ९०० कर्मचाऱ्यांच्या नावाने बँकेत काही हजारांची रक्कम एफडी म्हणून जमा केली होती. कर्मचाऱ्यांच्या दिवाळी भेटीवर त्यांनी चक्क ५० कोटी रुपयांचा खर्च केला होता. २०१६ मध्ये आपल्या १७६१ कर्मचा-यांना गाड्या, सदनिका आणि दागिने भेट म्हणून दिल्या होत्या. ‘हरे कृष्ण एक्सपोर्टचे’ चेअरमन असलेले सावजी यांनी २०१४ मध्ये देखील आपल्या कर्मचा-यांना दिवाळी बोनस म्हणून गाड्या, सदनिका आणि दागिन्यांचे वाटप केले होते. २०१४ मध्ये सावजी यांनी १३०० कर्मचा-यांना गाड्या, दागिने देऊन खूश केले होते. इतकचं नाही तर आपल्या कंपनीमध्ये २५ वर्षे काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी चक्क मर्सिडीजची बेन्झ गाडी भेट म्हणून दिली होती.

कर्मचाऱ्यांना कंपनीच्या नफ्यातील हिस्सा अशा प्रकारे देणाऱ्या ढोलकियांनी यंदा मात्र साध्या पद्धतीने दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. याबद्दल स्वत: ढोलकिया यांनीच माहिती दिली आहे. ‘यंदाची आर्थिक मंदी ही २००८ साली आलेल्या मंदीपेक्षाही गंभीर आहे. हिरे व्यापाऱ्यांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सूरतला या आर्थिक मंदीचा खूप मोठा फटका बसला आहे. मंदीमुळे व्यापाराला फटका बसला असताना कर्मचाऱ्यांना बोनस देणे शक्य होणार नाही. गेल्या सात महिन्यांमध्ये हिरे व्यापारामधील ४० हजार कर्मचारी बेरोजगार झाले आहेत. सुरतमधील कंपन्याची स्थिती बिकट परिस्थितीचा सामना करत असल्याचे ढोलकिया यांनी सांगितले.

कोण आहे सावजी ढोलकिया

‘हरे कृष्ण एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीचे सावजी संस्थापक आहे. त्यांच्या कंपनीतून जवळपास ५० देशांमध्ये हि-यांची निर्यात जाते. हिरा व्यापारांमध्ये ते ‘सावजी काका’ या नावाने प्रसिद्ध आहेत. गुजरातच्या दुधारा गावातल्या शेतकरी कुटुंबात सावाजींचा जन्म झाला. वयाच्या १३ व्या वर्षांत शाळा सोडल्यानंतर त्यांनी आपल्या काकाला हिरा व्यवसायात मदत करायला सुरूवात केली.

हिरे व्यापाराला फटका

सूरतमधील ‘डायमंड असोसिएशन’शी संबंधीत अधिकाऱ्यांनीही यंदा हिरे व्यवसायाला मंदीचा जबर फटका बसल्याचे म्हटले आहे. मागील काही महिन्यांमध्ये देशातील हिरा व्यापाराचे प्रमुख केंद्र असणाऱ्या सुरतमधील तब्बल २० टक्के कारखाने बंद पडले असून तेथील कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. मूळ रुपात हिरे पुरवणाऱ्या खनिज कंपन्यांनी वाढवलेले हिऱ्यांचे दर वाढवले आहेत. तसेच दागिन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पॉलिश हिऱ्यांच्या किंमतीमधील घसरण झाल्याने हिरे व्यापाराला फटका बसला आहे.