पशुवैद्यकात वापरल्या जाणाऱ्या डायक्लोफेनेक या औषधामुळे गिधाडांच्या अनेक प्रजाती धोक्यात आल्या असतानाच आता गरुडांनाही या औषधामुळे धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधी डायक्लोफेनेकमुळे गिधाडांची संख्या ९९ टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यानंतर आता गरुडाच्या दुर्मिळ प्रजातींनाही त्याचा फटका बसत असल्याचे दिसून आले आहे.
केंब्रिज विद्यापीठ मुद्रणालयाच्या बर्ड कॉन्झर्वेशन नियतकालिकानुसार राजस्थानात गुरे पुरलेल्या ठिकाणी गरुडांच्या स्टेपी या प्रजातीतील दोन गरुड मृतावस्थेत सापडले व त्यांच्या ऊतींमध्ये डायक्लोफेनेकचे अवशेष दिसून आले. अक्विला या गरुडांच्या प्रजातीलाही डायक्लोफेनेकचा धोका असून आशिया, युरोप व जगाच्या इतर भागांत गरुड पक्ष्यांना जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधामुळे धोका निर्माण झाला आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी, ब्रिटनची रॉयल सोसायटी ऑफ प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स, इंडियन व्हेटर्नरी रीसर्च इन्स्टिटय़ूट बरेली या संस्थांनी केलेल्या संशोधनात डायक्लोफेनेकमुळे गरुडांनाही धोका असल्याचे निष्पन्न झाले आहे. बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीचे संचालक असाद रहमानी यांनी सांगितले, की गरुडाच्या अनेक प्रजाती डायक्लोफेनेक या औषधाला बळी पडत आहेत.
 त्यामुळे डायक्लोफेनेक या औषधावरील बंदी भारतात अधिक कडकपणे राबवली गेली पाहिजे. डायक्लोफेनेकवर भारतात बंदी असतानाही ते पशूंना बेकायदेशीरपणे दिले जाते. हे औषध गिधाडे व गरुडांसाठी घातक ठरते. गिधाडे किंवा गरुड मेलेल्या जनावरांच्या मांसावर जगतात. त्यातून डायक्लोफेनेक त्यांच्या शरीरात प्रवेश करते. गिधाडांचे प्रमाण गेल्या दोन दशकांत ९९ टक्क्यांनी कमी झाले आहे. डायक्लोफेनेकमुळे मूत्रपिंड निकामी होऊन जिप्स गिधाडे राजस्थानात मरण पावलेली दिसून आली.
या पक्ष्यांचा व्हिसेरा, युरिक अ‍ॅसिड यामध्ये डायक्लोफेनेकचा अंश दिसून आला आहे. स्टेपी गरुडही जनावरांच्या मांसावरच जगतात, त्यामुळे उत्तर व मध्य तसेच काही प्रमाणात पश्चिम व पूर्व भारतात पाहुणे म्हणून येणारे हे पक्षी डायक्लोफेनेकला बळी पडले आहेत. अक्विला गरुड, टॉनी गरुड, इस्टर्न इंपिरियल गरुड, भारतीय ठिपकेबाज गरुड या सर्व गरुडांच्या प्रजातींना या डायक्लोफेनेकचा फटका बसला आहे. वैज्ञानिकांच्या मते अक्विला ही गरुडांची प्रजातच यामुळे नष्ट होऊ शकते असे या संशोधनात म्हटले आहे.
या पक्ष्यांचा व्हिसेरा, युरिक अ‍ॅसिड यामध्ये डायक्लोफेनेकचा अंश दिसून आला आहे. स्टेपी गरुडही जनावरांच्या मांसावरच जगतात, त्यामुळे उत्तर व मध्य तसेच काही प्रमाणात पश्चिम व पूर्व भारतात पाहुणे म्हणून येणारे हे पक्षी डायक्लोफेनेकला बळी पडले आहेत.