आजवर देशात जेवढे हिंदू दहशतवादी पकडले गेले ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते होते असा खळबळजनक आरोप काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांनी केला आहे. इतकेच नाही तर नथुराम गोडसे ज्याने महात्मा गांधींची हत्या केली तोही संघाचाच होता असेही दिग्वजिय सिंह यांनी म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच तिरस्कार आणि तेढ पसरवणारी आहे, ज्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते दहशतवादाकडे वळतात असेही वक्तव्य दिग्विजय सिंह यांनी केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एवढेच नाही तर मी कायम संघाचा दहशतवाद हाच शब्द वापरला आहे. हिंदू दहशतवाद हा शब्द कधीही वापरलेला नाही. दहशतवाद कोणत्याही धर्माशी जोडला जाऊ शकत नाही. कोणतीही दहशतवाद पसरवणारी घटना धर्माच्या आधारावर ठरवली जाऊ शकत नाही, कारण असा कोणताच धर्म नाही जो दहशतवादाचे समर्थन करतो असेही त्यांनी म्हटले आहे. ज्या दहशतवाद्यांनी मालेगाव, मक्का मशिद, समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट घडवले ते संघाच्या विचारांनी प्रेरित झालेले होते असाही आरोप त्यांनी केला.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही अशी संघटना आहे जी हिंसाचार आणि तिरस्कार यांचे समर्थन करते. त्यातूनच दहशतवाद जन्माला येतो असाही आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यानंतर भाजपाने त्यांच्यावर टीका केली आहे. दिग्विजय सिंह यांचे हे वक्तव्य अयोग्य असल्याचे भाजपाने म्हटले आहे.

दरम्यान फिटनेस चॅलेंजच्या मुद्द्यावरही दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी फिटनेस चॅलेंज देत आहेत. एकीकडे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरला आहे. जीएसटीमुळे व्यापारी हैराण झाले आहेत आणि पंतप्रधानांना फिटनेसची चिंता आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी माझ्यासोबत यावे आणि नर्मदा परिक्रमा करून दाखवावी असे आव्हानही दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिले. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर ६ कोटी झाडे लावण्याचा दावा करण्याऱ्या सरकारचीही त्यांनी खिल्ली उडवली. नर्मदा नदीच्या किनाऱ्यावर ५० हजार रोपटी दिसली तरीही पुष्कळ आहे असेही त्यांनी म्हटले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digvijay singhs controversial statement on rss and hindu
First published on: 18-06-2018 at 18:53 IST